नागपूर : ऑनलाईन रेल्वे तिकीट बुकिंगची सुविधा नसल्याने अपंग व्यक्तींना तिकीट खिडकीवर रांगेत लागून तिकीट खरेदी करावी लागतेय त्यामुळे त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तंत्रज्ञान व अत्याधुनिक सुविधांमुळे लोकांचे जीवन सुखकर होण्यात मदत होत आहे. रेल्वे तिकीट ऑनलाईन खरेदीची सुविधा झाल्याने तिकीट खिडकीवरील रांगा कमी झाल्या आहे. तसेच प्रवाशांच्या वेळेची बचत देखील होत आहे. मात्र, ही सुविधा अपंग व्यक्तींना उपलब्ध नाही. इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) रेल्वे तिकीटांची ऑनलाईन विक्री करीत असते. आयआरसीटीसीने तिकीट विक्रीच्या संगणकीकृत प्रणालीमध्ये अपंग ‘कोट्याचा’ समावेश केलेला नाही.

हेही वाचा…तृतीयपंथीयाची निर्घृण हत्या; मलकापूर शहर हादरले

त्यामुळे अपंगांना अजूनही डिजीटल इंडियामध्ये तिकीट खिडकीवर रांगेत लागून तिकीट खरेदी करावी लागत आहे. रेल्वेने प्रमुख रेल्वे स्थानकावर अपंगांसाठी स्वतंत्र तिकीट काऊंट दिला आहे. असे असले तरी अपंगांना तेथेपर्यंत जाण्यासाठी कोणाला तरी सोबत घेऊन जावे लागते. शिवाय ऑनलाईन तिकीट खरेदी सुविधामुळे घर बसल्या जे सहज शक्य आहे, त्यासाठी त्यांना नाहक पायपीट करावी लागत आहे.

रेल्वेतर्फे अपंग, ज्येष्ठ नागरिक तसेच कर्करोग पिडीत व्यक्तींसाठी सवलतीच्या दरात प्रवास सुविधा दिली जाते. एसी टू, एसी थ्री श्रेणीतील तिकीटांवर ५० टक्के प्रवास भाड्यात सवलत आहे. तर शयनयान श्रेणीत ७० टक्के प्रवास भाड्यात सवलत आहे. तसेच अपंग व्यक्तींसाठी काही जागा राखीव ठेवण्यात येत असतात. प्राधान्याने खालचे आसन (लोव्हर बर्थ) दिले जातात. पण, या सुविधांचा लाभ ऑनलाईन तिकीट बुकिंग करणाऱ्यांना मिळत नाही. या सुविधांचा लाभ केवळ तिकीट खिडकीवरून तिकीट खरेदी केल्यास मिळतो. त्यामुळे अपंग, अंध व्यक्तींना तिकीट खिडकीवरून तिकीट बुकिंग करण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे अपंगांसह अंधांना ऑनलाईन तिकीट बुकिंगची सुविधा तात्काळ उपलब्ध करून द्यावी जेणेकरून त्यांना सर्व सवलतीचा लाभ मिळू शकेल, अशी मागणी भारतीय यात्री केंद्राचे अध्यक्ष बसंतकुमार शुक्ला यांची आहे.

हेही वाचा…चंद्रपूर : परीक्षार्थ्यांना ऑनलाइन उत्तरपत्रिका मिळताच जिल्हा बँकेचे संचालक मंडळ अस्वस्थ; भरती प्रक्रिया…

यासंदर्भात आयआरसीटीसीचे क्षेत्र व्यवस्थापक व्हीनस राऊत यांच्याशी संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही. मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्निल निला यांनी याबाबत आयआरसीटीसीला कळवण्यात येणार असल्याचे सांगितले.अपंग, अंध, ज्येष्ठ नागरिकांना ऑनलाईन रेल्वे तिकीट खरेदीची सुविधा उपलब्ध करण्याची आणि त्यांना सर्व सवलतीचा लाभ देण्याची सूचना संबंधित विभागाला केली जाईल. दिलीप सिंह, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Online railway ticket purchases facility is unavailable for disabled persons rbt 74 sud 02