चंद्रपूर: चंद्रपूर फेरो अलॉय प्लांट ऑफ इंडिया लिमिटेड (SAIL) चे महाव्यवस्थापक अविनाश बोडेले यांच्या पत्नी जया बोडेले यांची ऑनलाईन शेअर खरेदी प्रकरणात ७४.५० लाख रुपयांनी फसवणूक केल्याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे तक्रारदार जया बोडेले या स्वत: सेल कंपनीत अधिकारी पदावर कार्यरत होत्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उच्च शिक्षित जया बोडाले सेलच्या एका प्लांटमध्ये डेप्युटी जनरल मॅनेजर पदावर कार्यरत होत्या. त्यांनी २०२० मध्ये स्वेच्छा निवृत्ती घेतली. यानंतर त्यांना अडीच कोटी रुपये मिळाले. सध्या जया बोडेले या गृहिणी आहेत. मात्र त्यांना यूट्यूबवर छोटे-छोटे व्हिडिओ पाहण्याची आवड आहे. ऑनलाईन शेअर संदर्भातील व्हीडीओ पाहत असतानाच त्यांना १५ ऑगस्ट रोजी एक लिंक प्राप्त झाली. या लिंकमध्ये दैनंदिन व्यापार आणि मार्केटिंग करून ८ ते १० टक्के नफा कमावण्याचे आमिष दाखवण्यात आले होते. या आमिषाला उच्च शिक्षित जया बोडेले या बळी पडल्या. त्यांना आयआयएफएल स्टॉक चॅट नंबर १ या ग्रुपमध्ये जोडण्यात आले. या ग्रुपमध्ये २४८ लोक सहभागी होते. याच ग्रुपमधील जिया गुणवाणी नावाच्या महिलेने जया बोडेले यांच्याशी संपर्क साधून कंपनीत सहाय्यक पदावर कार्यरत असल्याची स्वत:ची ओळख करून दिली. दरम्यान संभाषणानंतर जियाने ऑनलाईन जयाला एक लिंक पाठविली.

हेही वाचा – धक्कादायक… भाजीत पाल पडली, भंडाऱ्यात ५१ जणांना विषबाधा

हेही वाचा – धक्कादायक… ८ महिन्यांत नागपुरातून १३०० हून अधिक महिला बेपत्ता; प्रेमप्रकरण, अनैतिक संबंधांतून पलायन…

जया हिने २३ ऑगस्ट रोजी ५० हजार रुपये ऑनलाईन पाठवून शेअर्स खरेदी केले आणि त्यानंतर शेअर विक्री केले असता तीन ते चार हजार रुपये नफा झाला. २६ ऑगस्ट रोजी पुन्हा ५० हजार रुपये ऑनलाईन पाठविले असता आर्थिक लाभ झाला. त्यानंतर २७ ऑगस्ट रोजी पुन्हा ५० हजार रुपये पाठविले असता गुंतवणुकीवर १०-१० हजार रुपये नफा झाला. त्यानंतर नफ्याच्या लालसेपोटी जया यांनी २८ ऑगस्ट रोजीच १०.५० लाख रुपये ऑनलाईन पाठविले. त्यावर दिड लाख रुपये आर्थिक लाभ झाल्याचे या ग्रुपमध्ये दिसायला लागले. गुंतवणूक केल्यानंतर तत्काळ आर्थिक लाभ दिसत असल्याने जया यांनी ६२ लाख रुपये गुंतवणूक करून सर्व पैसे पाठवून दिले. त्यामुळे जया यांना शेअरच्या खात्यात ९६ लाख रुपये दिसायला लागले. दरम्यान यानंतर जिया गुणवानी यांनी पाच लाख रुपयांचे शेअर खरेदी करण्यास सांगितले. लगेच दुसऱ्या दिवशी त्यांच्या खात्यात ३.७० लाखांचे शेअर्स दिसून आले. जिया गुणवानी यांनी जया हिला १५ कोटी रुपये जमा करण्यास सांगितले. तसेच यासाठी दबाव टाकणे सुरू केले. पीडितेने एवढी रक्कम नको आणि आधीच गुंतवलेली ७४.५० लाखाची रक्कम परत करण्याची विनंती केली. पण नवीन रक्कम गुंतवली नाही तर आधी गुंतवलेली रक्कम परत करणार नाही, अशी धमकी जियाने दिली. अशा स्थितीत पीडितेने पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्याकडे तक्रार दाखल केली. यासंदर्भात अधिक माहितीसाठी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांना विचारणा केली असता ऑनलाईन शेअर खरेदी प्रकरणातील हे फसवणूक प्रकरण सायबर सेलकडे चौकशीसाठी पाठविले असल्याचे सांगितले. सायबर सेलने या प्रकरणात फसवणूक झाल्याचे निदर्शनास येताच रामनगर पोलीस ठाण्यात प्रकरण पाठविले. रामनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक आसिफ शेख यांनी दिली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Online share purchase a well educated woman of chandrapur was cheated of 74 50 lakhs rsj 74 ssb