अमरावती : वेल्‍डींग यंत्राची ऑनलाईन खरेदी एका नोकरदाराला चांगलीच महागात पडली. परतावा मिळवून देण्‍याच्‍या नावावर एटीएम कार्डचे तपशील प्राप्‍त करून घेत सायबर लुटारूने या नोकरदाराच्‍या बँक खात्‍यातील १० लाख ४३ हजार १५९ रुपयांची रक्‍कम वळती करून फसवणूक केल्‍याचा प्रकार उघडकीस आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तक्रारकर्ते हे सरकारी नोकरदार आहेत. सायबर पोलीस ठाण्‍यात दिलेल्‍या तक्रारीनुसार त्‍यांनी २१ ऑक्‍टोबरला एका ऑनलाईन शॉपिंग अ‍ॅपवरून ४ हजार ४५ रुपये किमतीच्‍या वेल्‍डींग यंत्राची मागणी नोंदवली. या यंत्रासाठी त्‍यांनी एका खासगी वित्‍तपुरवठा कंपनीच्‍या कार्डवर ईएमआयद्वारे लगेच पैसेदेखील भरले होते. या वेल्‍डींग यंत्राचे पार्सल घेऊन कुरिअर कंपनीचा कर्मचारी २९ ऑक्‍टोबरला त्‍यांच्‍या घरी पोहोचला. त्‍याने त्‍यांच्‍या पत्‍नीला पार्सल प्राप्‍त करून घेण्‍यासाठी ओटीपी विचारला. त्‍यावेळी त्‍याच्‍या पत्‍नीने त्‍यांना फोन केला, पण तक्रारकर्ते त्‍यावेळी कार्यालयात एका बैठकीत व्‍यस्‍त होते. ते फोनवर संभाषण करू शकले नाहीत. अखेर कुरिअर कंपनीचा कर्मचारी पार्सल परत घेऊन गेला.

हेही वाचा – १३.८३ लाख नागरिकांची कुष्ठ व क्षयरोग तपासणी होणार

हेही वाचा – नागपूर : कॉंग्रेस नेत्याने सोंटूकडे नव्हे तर विक्रांतकडे गुंतवले २० कोटी! सोंटूसाठी दलालीचे काम करायचा विक्रांत अग्रवाल?

नोकरदार जेव्‍हा घरी पोहोचले, तेव्‍हा त्‍यांनी शॉपिंग अ‍ॅपवर तक्रार नोंदविण्‍याचा प्रयत्‍न केला. पण तक्रार नोंदविणे शक्‍य न झाल्‍याने त्‍यांनी सर्च इंजिनवर संबंधित शॉपिंग कंपनीचा ग्राहक सेवा क्रमांक शोधला. त्‍यांना एक मोबाईल क्रमांक मिळाला. त्‍यांनी या क्रमांकावर संपर्क साधल्‍यावर वापरकर्त्‍यांने आपण वेल्‍डींग यंत्राच्‍या खरेदीसाठी दिलेली रक्‍कम परत मिळवून देऊ शकतो, अशी बतावणी केली. त्‍यांनी या अज्ञात आरोपीला बँकेचा खाते क्रमांक, एटीएम कार्डचे सर्व तपशील सांगितले. त्‍यानंतर सायबर लुटारूने आता रात्र झाली असून नेटवर्कची समस्‍या असल्‍याने परताव्‍याची प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नाही, असे सांगितले. या सायबर लुटारूने त्‍यांना एक लिंक पाठवली. त्‍याने सांगितल्‍याप्रमाणे नोकरदाराने प्रक्रिया केली आणि त्‍यांच्‍या खात्‍यातील १० लाख ४३ हजार १५९ रुपये सायबर लुटारूकडे वळते झाले. या प्रकरणी सायबर पोलिसांनी अज्ञात आरोपीच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल केला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Online shopping fraud cases 10 lakh fraud with an employee mma 73 ssb
Show comments