अकोला : आयुष्मान योजनेत ‘गोल्डन कार्ड’चे जिल्ह्यात केवळ ३१ टक्के वितरण झाले आहे. उर्वरित उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आव्हान प्रशासनापुढे निर्माण झाले आहे. त्यासाठी योजनेच्या कार्याला गती देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले. आयुष्मान भव मोहीम व नियमित लसीकरणाबाबत बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. यावेळी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी वैष्णवी बी., जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. दीपक करंजीकर आदी उपस्थित होते. केंद्र शासनाची आयुष्मान भव मोहीम १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबरदरम्यान जिल्ह्यात सर्व आरोग्य संस्थांत राबवण्यात येणार आहे.
हा उपक्रम यशस्वीपणे राबवण्याचे निर्देश सुद्धा जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले. सर्वांसाठी आरोग्य या उद्दिष्टपूर्तीसाठी आयुष्मान भव ही मोहीम महत्त्वाचे पाऊल आहे. मोहिमेत आयुष्मान आपल्या दारी ३.०, आयुष्मान सभा, आयुष्मान मेळावा, अंगणवाडी व प्राथमिक शाळांमधील मुलांची तपासणी आदी कार्यक्रम राबवले जाणार आहेत. त्यादृष्टीने अचूक कृती आराखडा व गावोगाव प्रभावी अंमलबजावणी करावी. मिशन इंद्रधनुष मोहिमेत ११ ते १६ सप्टेंबर, तसेच दि. ९ ते १४ ऑक्टोबर या कालावधीत लसीकरणाचे १०० टक्के उद्दिष्ट गाठण्यासाठी लसीकरण न झालेल्या बालकांचे लसीकरण पूर्ण करण्यात येईल. ते नियोजित कालावधीत पूर्ण करावेत, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. लसीकरणाबाबत जिल्ह्यात व्यापक जनजागृती होणे आवश्यक आहे. त्यासाठी मोहीम स्तरावर काम व्हावे. स्थानिक यंत्रणेला प्रोत्साहित करा. स्थानिक स्वराज्य संस्थांबरोबरच स्वयंसेवी संस्था, बचत गट यांचेही सहकार्य मिळवावे, असे देखील ते म्हणाले.
हेही वाचा : प्राध्यापक भरतीला अखेर मुहूर्त… ‘एमपीएससी’तर्फे शेकडो जागांवर भरती, वाचा कुठल्या विभागात किती जागा…
१०.७८ लाख कार्ड वितरणाचे उद्दिष्ट
आयुष्मान योजनेत ‘गोल्डन कार्ड’चे उद्दिष्ट १० लाख ७८ हजार असून जिल्ह्यात ३१ टक्के काम पूर्ण झाले. आणखी सात लाखा ४३ हजार ८२० कार्डचे वितरण बाकी आहे. आयुष्मान योजनेच्या अंमलबजावणीला व्यापक स्वरूप देऊन नागरिकांचा सहभाग वाढवण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न व्हावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिल्या आहेत.