अकोला : ‘अन्याय माझे कोट्यानुकोटी मोरेश्वरा बा तू घाल पोटी…’ गणरायाला असे साकडे घालणारी ९७ टक्के गणोशोत्सव मंडळे आपल्या माथी अनधिकृत वीज वापराचे पाप घेत आहेत. महावितरणने घरगुती दरात वीज देण्याची योजना जाहीर केली असतानाही उत्सवासाठी अनधिकृत वीज वापरण्यात या मंडळांना धन्यता वाटत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अकोला जिल्ह्यात महावितरणच्या आवाहनाला प्रतिसाद देत अधिकृतरित्या ४६ मंडळांनीच मीटर घेतले. शहरासह जिल्ह्यात एकूण १७३२ मंडळांनी गणपतीची स्थापना झाल्याची नोंद पोलीस दप्तरी आहे. त्यापैकी केवळ ४६ म्हणजे २.६५ टक्के मंडळांनीच अधिकृत मीटर घेतल्याने इतर मंडळांनी अनधिकृत विजेतूनच गणेशोत्सवाचा झगमगाट केला. यामुळे एकादा मोठा वीज अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हेही वाचा – नागपूर : केअर रुग्णालयातील ७० रुग्ण इतरत्र हलवले; पावसाचा तडाखा, धावाधाव

अकोला शहरासह जिल्ह्यात एकूण १७३२ गणेश मंडळांनी ‘श्रीं’च्या मूर्तीची स्थापना केल्याची नोंद पोलिसांनी घेतली. यामध्ये शहरातील ३२० तर ग्रामीण भागातील १४१२ मंडळांचा यामध्ये समावेश आहे. एक गाव एक गणपती योजनेत ३१० मंडळे सहभागी झाली आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या उत्सवातील सजावट आणि रोषणाईसाठी सर्रास अनधिकृत वीज वापरली जाते, त्यास आळा घालण्यासाठी घरगुती दरात वीज महावितरणने उपलब्ध करून दिली. एक मंडळ सरासरी ५०० ते २५०० युनिट वीज वापरते. गणेश मंडळांसाठी हमी रक्कम जमा ठेऊन मीटर घेण्याची ही योजना आहे. मात्र, शहरातील अधिकृत ३२० पैक केवळ ४२ मंडळांनी अधिकृत वीज जोडणीसाठी महावितरणकडे अर्ज करून वीज घेतली आहे. उरलेली मंडळे अनधिकृत वीज वापरत असल्याचे निदर्शनात येते. महावितरणच्या अकोट विभागात गणेशोत्सव मंडळांना चार जोडण्या देण्यात आल्या आहेत, तर ग्रामीण भागात एकही वीज जोडणी दिल्याची नोंद नाही.

लोकमान्य टिळकांनी समाजप्रबोधनासाठी सार्वजनिक गणेशोत्सव साजरे करण्यास सुरुवात केली होती. मात्र, अनधिकृत वीज वापरणारी मंडळे समाजापुढे कोणता आदर्श निर्माण करीत आहेत, असा सवाल उपस्थित केल्या जात आहे. महावितरणने गणेशोत्सवासाठी घरगुती दरात वीजपुरवठा योजना लागू केली. मात्र, त्याचा लाभ बहुतांश गणेश मंडळांनी घेतलेला दिसत नाही.

हेही वाचा – काय सांगता? चक्क पावसाळ्यात झाडाला लागले आंबे, तज्ज्ञ म्हणतात…

महावितरणकडून हमी रक्कम भरल्यानंतर तातडीने मीटर दिले जाते. मंडळांनी वापरलेल्या विजेचे देयक त्यातून कापून उरलेले पैसे या मंडळाला परत केले जातात. त्यामुळे अनधिकृत वीज न वापरता अधिकृत मीटर घेण्याचे आवाहन महावितरणने केले होते. अनधिकृत वीज घेताना सुरक्षेचे सर्व नियम धाब्यावर बसविले जातात. त्यामुळे मोठा अपघात होऊन गणेश भक्तांची सुरक्षा धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. गणेशोत्सव मंडळांनी आपली जबाबदारी ओळखण्यासह अधिकृत वीजपुरवठा घेण्यासाठी महावितरणनेदेखील प्रभावी जनजागृती करण्याची खरी गरज आहे.

तारावरून थेट पुरवठा?

गणेशोत्सव काळात अनेक मंडळांकडून थेट तारांवरून वीज घेतली जात असल्याचे पाहणीत उघड झाले. बहुतांश वीज मनपाच्या पथदिव्यांच्या तारावरून होत असल्याने आपले काही घेणे देणे नसल्याची भूमिका घेत कंपनीने हात झटकले आहेत. दुसरीकडे घरातून वीज घेणाऱ्या मंडळांमध्ये जनजागृती करण्यात महावितरण फारसे गांभीर्य दाखवत नाही. अनधिकृत वीज वापर रोखण्याची जबाबदारी आमचीच असल्याचे वारंवार सांगणाऱ्या वीज कंपनीने मात्र या प्रकरणी सोयीस्कररित्या मनपावर सर्वकाही सोडून आपल्याच भूमिकेला छेद दिला. वीज कंपनी महापालिकेला वीज पुरवित असल्याने त्यांच्याकडून देयक वसूल करीत असते. त्यामुळे वीजदेयक मिळणारच असल्याचे गणित मांडत महावितरणने केवळ बघ्याची भूमिका घेतली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Only 46 out of 1732 ganesh mandals in akola have official electricity ppd 88 ssb
Show comments