नागपूर: जिल्ह्यात १ जानेवारी ते ६ नोव्हेंबर २०२३ दरम्यान दहा महिन्यात हिवतापाचे केवळ ५ रुग्ण नागपूर महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून नोंदवले गेले आहे. त्यामुळे एवढे कमी रुग्ण आरोग्य विभागाला आढळल्याने या नोंदी वादात सापडल्या आहेत.
नागपूर जिल्ह्यात यंदा डेंग्यू, स्वाईन फ्लूचे मोठ्या संख्येने रुग्ण आढळण्यासह घरोघरी सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण आढळत आहेत. त्यातच डेंग्यूहून जिल्ह्यात स्वाईन फ्लूचे मृत्यूही जास्त असल्याने आरोग्य विभागात चिंता वाढली आहे. नागपूर जिल्ह्यात मेडिकल-मेयोसह खासगी रुग्णालयात हिवतापाचेही रुग्ण अधून-मधून आढळतात.
हेही वाचा… नागपूर: विवाहितेवर बलात्कार करून खंडणीची मागणी
नागपूर शहर व ग्रामीण असे जिल्ह्याचे क्षेत्रफळ बघता येथे हिवतापाचेही रुग्ण सातत्याने आढळत असल्याचे या क्षेत्राचे जाणकार सांगतात. परंतु नागपूर महापालिकेने गेल्या दहा महिन्यात नागपूर शहरात केवळ १ तर सार्वजनिक आरोग्य विभागाने नागपूर ग्रामीणला केवळ ४ असे एकूण जिल्ह्यात ५ रुग्ण नोंदवले. त्यामुळे येथे खासगी व सरकारी रुग्णालयांकडून सरकारी यंत्रणांना अचूक रुग्णांची आकडेवारी कळवली जाते काय? हा प्रश्न या क्षेत्राचे जाणकार व्यक्त करत आहेत. आरोग्य विभागाकडून मात्र ही आकडेवारी संबंधित विभागाने उपलब्ध केलेल्या माहितीनुसार असल्याचे सांगत अचूक असल्याचा दावा केला आहे.