अकोला महापालिकेकडून करवसुलीचे खासगीकरण करून एका कंपनीला कंत्राट देण्यात आले होते. मात्र, कंपनीकडून करारनाम्याचा भंग करण्यात आल्याने अखेर हे कंत्राट रद्द करण्यात आले आहे. संपूर्ण राज्यात केवळ अकोला महापालिकेत करवसुलीचे खासगी कंपनीला कंत्राट देण्यात आले होते, हे विशेष. मात्र, हा प्रयोग फसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. आता अकोला महापालिकेपुढे करवसुलीचे मोठे आव्हान राहील.
अकोला महापालिकेकडून मालमत्ता कर, बाजार परवाना वसुली, पाणी पट्टी करवसुली, दैनंदिन बाजार वसुली आदी करवसुलीचे कंत्राट २ ऑगस्ट २०२३ पासून मे. स्वाती इंडस्ट्रिज (रांची) यांना देण्यात आले होते. या कंपनीकडून करारनामाच्या अटी व शर्तीनुसार काम केले नसल्याने मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. सुनील लहाने यांच्या आदेशान्वये कंपनीचा कंत्राट रद्द करण्यात आला आहे. वसुलीचे काम अपेक्षेप्रमाणे होत नसल्याने महापालिकेने स्वाती इंडस्ट्रिज कंपनीला एक महिन्यापूर्वी नोटीस बजावली होती. त्यानंतरही कंपनीच्या वसुलीच्या कामात सुधारणा झाली नाही. महापालिकेच्या तत्कालीन आयुक्त कविता द्विवेदी यांनी ८.४९ टक्क्यांच्या कमिशनवर स्वाती इंडस्ट्रिजला करवसुलीचे कंत्राट दिले होते. याला वंचित बहुजन आघाडीचे शहर संघटक नीलेश देव, यांनी विरोध करून अन्नत्याग आंदोलनही केले होते. १५ महिन्यांमध्ये स्वाती इंडस्ट्रिजने केवळ ३१ कोटी रुपयांची वसुली केली. असमाधानकारक कामकाजामुळे अखेर स्वाती इंडस्ट्रिजसोबतचा करारनामा रद्द केला आहे.
हे ही वाचा… प्रेयसीसमोर कानशिलात लगावणे आईवडिलांच्या जीवावर बेतले !
कर वसुली करण्याची कसरत अकोला महापालिका प्रशासनाला करावी लागेल. मालमत्ता कराचे एकूण १६५ कोटी रुपये थकीत आहेत. करवसुलीसाठी महापालिकेकडे मनुष्यबळ देखील अत्यल्प प्रमाणात आहे. त्यामुळे वसुलीवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. डॉ. लहाने यांच्या आदेशान्वये यापुढे महापालिकेच्या सर्व प्रकारची करांची वसुली महापालिका स्तरावर पूर्वीप्रमाणे केली जाणार आहे. मालमत्ता कर, बाजार परवाना वसुली, पाणी पट्टी करवसुली दैनंदिन बाजार वसुली आदी करांची वसुली महापालिका कर्मचाऱ्यांमार्फत करण्यात येणार आहे. शहरातील नागरिकांनी कोणत्याही खासगी व्यक्तीकडे करासंदर्भातील पैशांचा व्यवहार करू नये. महापालिकेच्या मुख्य कार्यालय आणि चारही झोन कार्यालय येथे कराचा भरणा करण्याची सुविधा करण्यात आली असून शहरातील नागरिकांनी थकीत व चालू वर्षातील मालमत्ता कराचा भरणा करण्याचे आवाहन कर अधीक्षक तथा सहा.आयुक्त विजय पारतवार यांनी केले आहे.