अमरावती : भाजपा राम मंदिराचे राजकारण करीत आहे की व्‍यवसाय हे त्‍यांनाच ठाऊक, अशी बोचरी टीका राष्‍ट्रवादी काँग्रेसचे ज्‍येष्‍ठ नेते शरद पवार यांनी बुधवारी येथे पत्रकारांशी बोलताना केली. अयोध्‍येत राम मंदिर उभारले गेले, त्‍याचा आपल्‍याला आनंद आहे. अयोध्‍येतील राम मंदिर प्राणप्रतिष्‍ठा सोहळ्याचे निमंत्रण आपल्‍याला मिळालेले नाही. साधारणपणे पूजा-अर्चना ज्‍या ठिकाणी होते, त्‍या ठिकाणी सहसा जात नाही. प्रत्‍येकाची वैयक्तिक श्रद्धा असते. त्‍याला आपला विरोध नाही. उद्धव ठाकरे यांना निमंत्रण मिळाले की नाही, हे आपल्‍याला माहीत नाही, असे पवार यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

…तर देशात सत्तापरिवर्तन शक्य

नुकत्‍याच झालेल्‍या चार राज्‍यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल अपेक्षेनुसार लागलेले नाहीत. पण, त्‍यामुळे आम्‍ही नाउमेद झालेलो नाही. आगामी लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडी एकत्रपणे लढली, तर देशात सत्‍तापरिवर्तन शक्‍य आहे, असा दावा पवार यांनी केला. इंडीया आघाडीने आगामी निवडणुकीसाठी एक‍त्रितपणे सामोरे जाणे आवश्‍यक आहे. बहुजन समाज पक्षाच्‍या नेत्‍या मायावती यांना आघाडीत सहभागी करून घेण्‍याविषयी समाजवादी पक्षाचा वेगळा दृष्टिकोन आहे. त्‍यांना बाजूला सारून वेगळा निर्णय घेण्‍याची गरज नाही. प्रकाश आंबेडकर यांच्‍या वंचित बहुजन आघाडीचा इंडिया आघाडीत समावेश व्‍हावा, ही सर्वांचीच इच्‍छा आहे. त्‍यावर चर्चा सुरू आहे. सकारात्‍मक निर्णय होईल, अशी अपेक्षा आहे, असे पवार यांनी सांगितले.

हेही वाचा – यवतमाळ: जिल्ह्यात १२ महिन्यात ७७ खून! कौटुंबिक वादातून सर्वाधिक घटना

शरद पवार म्‍हणाले, नुकतीच इंडिया आघाडीची बैठक झाली. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी दक्षिणेकडून ‘भारत जोडो’ यात्रा सुरू केली होती. आता उत्‍तर भारतातही ही यात्रा व्‍हावी, अशी सूचना काही सहकाऱ्यांनी केली. त्‍यानुसार आता राहुल यांनी पुन्‍हा ही यात्रा सुरू करण्‍याचा निर्णय घेतला आहे.

ही तर सरकारी दडपशाही

संसदेत शिरून गॅस नळकांड्या फोडण्‍याची घटना घडल्‍यानंतर या गंभीर विषयावर चर्चा व्‍हावी, अशी मागणी विरोधी पक्षांनी केली होती. पण त्‍यावर चर्चा न करता लोकसभा आणि राज्‍यसभेच्‍या १४६ खासदारांना निलंबित करून मोदी सरकारने दडपशाही केली. सरकारला माहितीच द्यायची नाही. विरोधकांच्‍या अनुपस्थितीत तीन महत्त्वाची विधेयके पारित करण्‍यात आली, त्‍यावर चर्चा होणे आवश्‍यक होते. हा अत्‍यंत गंभीर मुद्दा आहे, असे पवार म्‍हणाले.

आगामी लोकसभा निवडणुकीच्‍या तयारीसाठी महाराष्‍ट्रात मी अध्‍यक्ष असलेल्‍या राष्‍ट्रवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरे यांच्‍या नेतृत्‍वातील शिवसेनेची बैठक होणार आहे. त्‍यात चर्चा होऊन जागा वाटपाचे सूत्र ठरेल, असेही पवार यांनी स्पष्ट केले.

पंतप्रधानपदाचा चेहरा आवश्‍यक नाही

इंडिया आघाडीच्‍या पंतप्रधानपदाच्‍या चेहऱ्याबाबत शरद पवार म्‍हणाले की, आघाडीचा पंतप्रधानपदाचा चेहरा आधी ठरवणे आवश्‍यक नाही. १९७७ च्या लोकसभा निवडणुकीवेळी विरोधकांच्या आघाडीचा पंतप्रधानपदाचा चेहरा ठरला नव्हता. निवडणुकीच्या निकालानंतर मोरारजी देसाई पंतप्रधान झाले. त्यावेळीदेखील असे म्हटले जात होते की, विरोधकांचे नेतृत्व कोण करणार हे ठरले नाही. पण, जनतेला बदल हवा असेल तर ते वेगळा निर्णय घेतात, असे पवार म्‍हणाले.

हेही वाचा – कृषी क्षेत्रात प्रगतीसोबतच आव्हाने वाढली, उपमुख्यमंत्री फडणवीसांचे मत; कृषी विद्यापीठात ॲग्रोटेक प्रदर्शन

बच्चू कडूंशी होणारी भेट राजकीय नाही

अचलपूरचे आमदार बच्‍चू कडू हे महाविकास आघाडीत सहभागी होणार असल्‍याच्‍या चर्चेवर उत्‍तर देताना शरद पवार म्‍हणाले, आपण उद्या अचलपूर तालुक्‍यात जात आहोत. बच्‍चू कडू यांनी निमंत्रण दिले आहे. त्यांच्‍याशी होणारी भेट राजकीय स्‍वरुपाची नाही.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Only bjp knew whether it is doing ram temple politics or business says sharad pawar and criticizes bjp mma 73 ssb
Show comments