नागपूर : अंमली पदार्थांमध्ये गांजा हे फार प्रचलित आहे. गांजाचे मोठ्या प्रमाणावर सेवन होत असल्याचे मोठ्या प्रमाणात याची बेकायदेशीर वाहतूक होत असते. भारतात नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबसस्टेस [एनडीपीएस] कायदा,१९८५ अंतर्गत गांजा प्रतिबंधित आहे. मात्र अलिकडेच मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गांजाची तस्करी करण्याच्या आरोप असलेल्या एका व्यक्तीला जामीन मंजूर केला. आरोपीला जामीन देताना गांजा म्हणजे काय हे न्यायालयाने स्पष्ट करून सांगितले.

काय आहे प्रकरण?

बुलढाणा जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखेला गुप्त माहिती प्राप्त झाली की एक व्यक्ती कारमधून मोठ्या प्रमाणात गांजा नेत आहे. गुप्त माहितीच्या आधारावर पोलिसांनी मारुती स्विफ्ट कारमधून आरोपी मोहम्मद जाकीर नबाव अली याला अटक केली. आरोपीच्या गाडीतून पोलिसांनी ५० किलो गांजा जप्त केला. यात हिरव्या रंगाच्या बिया, पाने, देठ, मूळ यांचा समावेश होता. तपासानंतर पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले. दरम्यान, आरोपीने उच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला. न्यायालयात आरोपीने युक्तिवाद केला की त्याच्याकडून जप्त करण्यात आलेला मुद्देमाल प्रतिबंधित गांजाच्या परिभाषेत येत नाही. त्यामुळे याप्रकरणी सत्र न्यायालयाचा निर्णय येतपर्यंत त्याला जामीन देण्यात यावा. दुसरीकडे, पोलिसांनी याला जोरदार विरोध केला आणि जामीन नाकारण्याची विनंती केली. दोन्ही पक्षांच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने अटींसह आरोपीला जामीन देण्याचा निर्णय दिला.

हे ही वाचा…भंडारा : चरण वाघमारे यांच्या हाती राष्ट्रवादीची तुतारी

न्यायालयाने काय सांगितले?

एनडीपीएस कायदा.१९८५ मध्ये प्रतिबंधित गांजाला परिभाषित करण्यात आले आहे. या कायद्याचा दाखल देताना न्यायालयाने सांगितले की गांजा वनस्पतीचे फूल प्रतिबंधित आहे. फुलांशिवाय गांजा वनस्पतीचे इतर भाग असतील तर त्याला प्रतिबंधित गांजा म्हणता येणार नाही. याप्रकरणात पोलिसांनी जप्त केलेल्या मुद्देमालात गांजाच्या फुलांच्या प्रमाणाबाबत काहीही उल्लेख केला नाही. पोलिसांनी गांजाचे पान, बिया यासह इतर भागांचे एकत्रित वजन केले आणि आरोपीकडून ५० किलो गांजा जप्त झाला असल्याचे एकत्रितपणे उल्लेख केला. कायद्यानुसार, २० किलोपेक्षा अधिक प्रमाणात गांजा जप्त केल्यावर ते कायद्याच्या चौकटीत येते. पोलिसांनी आरोपीकडून गांजा जप्त करताना एकत्रितपणे केल्याने आरोपी जामीन मिळविण्यास प्राप्त आहे, असे न्यायालयाने निर्णयात स्पष्ट केले. गांजाचे केवळ फूलच प्रतिबंधित गांजाच्या परिभाषेत येते. गांजा वनस्पतीच्या बियांना, पानांना किंवा इतर भागाला एनडीपीएस कायद्याच्या अंतर्गत गांजा म्हणता येणार नाही, असे मत न्या.उर्मिला जोशी-फाळके यांच्या खंडपीठाने आरोपीला जामीन देताना नोंदविले.