नागपूर : राज्यातील विविध सीमा तपासणी नाक्यांवर परिवहन खात्याने आदर्श कार्यपद्धती लागू केल्यावरही त्याची अंमलबजावणी नीट होत नव्हती. त्यामुळे वाहतूक कोंडी ही नित्याची बाब झाली होती. या प्रकाराची दखल घेत परिवहन खात्याने नव्याने आदर्श कार्यपद्धती तयार केली असून आता प्रत्येक तासाला एका नाक्यावर केवळ पाच जड वाहनांचीच तपासणी केली जाणार आहे.

राज्यातील २२ सीमा तपासणी नाक्यांचे आधुनिकीकरण व संगणकीकरणाचा निर्णय शासनाने २५ ऑगस्ट २००८ रोजी घेतला. २५ जानेवारी २०१७ मध्ये या नाक्यांवरील जड वाहनांच्या तपासणीबाबतची आदर्श कार्यपद्धती ठरली. त्यात नाक्यावरील प्रत्येक वाहन लेनमधील वजन काट्यावरून जाणे अनिवार्य करण्यात आले. परंतु, यामुळे वाहतूक कोंडीच्या तक्रारी वाढल्या. या तक्रारींची दखल घेऊन आता प्रत्येक तासाला केवळ ४ ते ५ वाहने आणि दिवसाला १०० ते १०१ वाहनांचीच तपासणी करण्याबाबतचे आदेश वसई, धुळे, नागपूर (ग्रामीण), अमरावती, लातूर, नाशिक, नांदेड, कोल्हापूर, सोलापूर, पनवेल, जळगाव, चंद्रपूर प्रादेशिक परिवहन कार्यालयांना देण्यात आले आहेत. त्यामुळे आता सीमा तपासणी नाक्यांवर आरटीओच्या अधिकाऱ्यांकडून सरसकट सर्व वाहनांची तपासणी केली जाणार नाही. सोबतच प्रत्येक सीमा तपासणी नाक्यांवर सर्व मार्गिका सुरू राहतील याचीही खबरदारी आरटीओ अधिकाऱ्यांना घ्यावी लागणार आहे.

हेही वाचा – काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी कायमच! खासदारांच्या सत्कार सोहळ्याकडे शहराध्यक्ष, पदाधिकाऱ्यांची पाठ

प्रवासी वाहनांचा ठरलेल्या मार्गिकेतूनच प्रवास

सीमा तपासणी नाक्यावर प्रवासी बस, प्रवासी टॅक्सीसाठी स्वतंत्र मार्गिका आहे. त्यानंतरही बरीच प्रवासी वाहने मालवाहू वाहनांसाठीच्या मार्गिकेतून जातात. त्यामुळे प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांना नाक्यावर जास्त काळ थांबावे लागते. त्यामुळे आता प्रवासी वाहने त्यांच्यासाठीच्याच मार्गिकेतूनच जातील, याकडे लक्ष देण्याचे आदेश आरटीओ अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

“सीमा तपासणी नाक्यांचे आधुनिकीकरण व संगणकीकरणामुळे अतिभार असलेली वाहने लगेच ओळखता येतात. त्यामुळे सरसकट सर्व वाहनांची तपासणी न करता तासाला केवळ ४ ते ५ वाहनांची तपासणी केली जाणार आहे. या नवीन निर्णयामुळे नाक्यांवरील वाहतूक कोंडी कमी होईल.” – विवेक भिमनवार, परिवहन आयुक्त, मुंबई.

हेही वाचा – महायुतीची ‘लाडकी बहीण’ तर काँग्रेसची ‘महालक्ष्मी’! जाणून घ्या काय आहे विशेष

राज्यात वाहनांची नोंदणी किती?

राज्य परिवहन विभागाने सामायिक केलेल्या आकडेवारीनुसार, २०२३ मध्ये महाराष्ट्रात २५ लाख ६३ हजार ४९१ नवीन वाहनांची नोंदणी झाली, मागील वर्षी २३ लाख ७४ हजार ५९१ वाहनांची नोंदणी झाली होती, जी ७.९१ टक्क्यांनी वाढली आहे. २०१९ मधील १९.२३ लाख वाहनांच्या तुलनेत २०२२ मध्ये महाराष्ट्रात किमान २३.७४ लाख वाहनांची नोंदणी झाली असून नोंदणीत २३.४६ टक्क्यांनी वाढ झाली आहे.