महेश बोकडे

शहरातील शासकीय रुग्णालयातील वास्तव; डॉक्टरांना छापील कागदाचा आधार

उपराजधानीतील मेडिकल, सुपरस्पेशालिटी, ट्रामा केयर सेंटर, मेयो या सर्व शासकीय रुग्णालयांतील एकूण तीन हजार खाटांसाठी मेडिकलमध्ये केवळ एकच आहार तज्ज्ञ आहे.  मेडिकल वगळता इतर एकाही रुग्णालयात आहार तज्ज्ञ नसल्यामुळे रुग्णांना छापील कागदानुसार डॉक्टर आहाराचा सल्ला देतात, परंतु चुकीच्या आहाराने कुणाची प्रकृती बिघडल्यास जबाबदार कोण, हा खरा प्रश्न आहे.

प्रत्येक व्यक्तीसाठी त्याची शरीरयष्टी, प्रतिकारशक्ती, शरीराला आवश्यक घटकानुसार आहार निश्चित केला जातो. रुग्णाला मधुमेहासह इतर आजारांचा इतिहास बघून आहार द्यायला हवा. संबंधित रुग्ण लवकर बरा होण्यात त्याच्या औषधोपचारासह अचूक आहाराचीही भूमिका महत्त्वाची असते, परंतु उपराजधानीतील मेडिकल आणि मेयो या दोन्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासह त्याच्या अखत्यारित येणाऱ्या सुपरस्पेशालिटी आणि ट्रामा केअर सेंटरमध्ये आहार तज्ज्ञांची जवळपास सर्वच पदे रिक्त आहेत.

येथे आहार तज्ज्ञांची पदे गेल्या काही वर्षांत गरजेनुरूप वाढवलीही गेली नाहीत. सुपरस्पेशालिटीमध्ये आहार तज्ज्ञाचे एकच पद भरले असून त्याला प्रतिनियुक्तीवर मेडिकलला पाठवण्यात आले आहे. त्यामुळे येथील पद अप्रत्यक्षपणे रिक्तच आहे. मेडिकलला दोन मंजूर पदांपैकी सुपरचा हा एकच आहार तज्ज्ञ काम बघतो तर ट्रामा केयर सेंटरमध्ये एकही आहार तज्ज्ञ नाही. त्यामुळे येथील रुग्णांना पारंपरिक पद्धतीनुसार छापील पद्धतीचा आहाराचा सल्ला देणारा कागद डॉक्टरांकडून दिला जात आहे. पण, हा पर्याय रुग्णांच्या जीवावर बेतू शकतो.

वर्षांला एक लाखावर आंतरुग्णांची नोंद

राज्यात केवळ नागपुरात मेडिकल, मेयो अशी दोन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालये आहेत. मेडिकलच्या अखत्यारित सुपरस्पेशालिटी रुग्णालय आणि ट्रामा केयर सेंटर येथे तर मेयोच्या आखत्यारित उत्तर नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनुसंधान केंद्र आहे. मेडिकल आणि मेयो या दोनच रुग्णालयांत गेल्यावर्षी १३ लाख ५७ हजार १६२ बाह्य़रुग्णांसह १ लाख २,३०५ आंतरुग्णांची नोंद करण्यात आली. प्रत्येक वर्षी ही संख्या वाढतच असताना त्या तुलनेत आहार तज्ज्ञ उपलब्ध नाहीत.

आहार तज्ज्ञांच्या निकषांना बगल

जागतिक आरोग्य संघटनेसह केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या निकषानुसार प्रत्येक रुग्णालयांत प्रत्येक २०० खाटांमागे एक आहार तज्ज्ञांची गरज आहे. परंतु उपराजधानीतील सर्वच शासकीय रुग्णालयांमध्ये या निकषाकडे दुर्लक्ष केले जात आहे. याबाबत आहार तज्ज्ञांकडून बऱ्याचदा शासनाला निवेदन सादर करण्यात आले. परंतु त्याचा काहीच उपयोग झाला नाही.

मेडिकल आणि सुपरस्पेशालिटी रुग्णालयातील प्रत्येक आंतरुग्णाला उपचारादरम्यान प्रशासनाकडून संतुलित आहार उपलब्ध केला जातो. रुग्णाला रुग्णालयातून सुट्टी देताना येथे उपलब्ध आहार तज्ज्ञ आहाराबाबतचा सल्ला देतात. दोन्ही रुग्णालयात आहार तज्ज्ञ वाढवण्याबाबत शासनाला प्रस्ताव दिला असून लवकरच त्याला मंजुरी मिळण्याची आशा आहे.

– डॉ. अभिमन्यू निसवाडे, अधिष्ठाता, मेडिकल.

आहारशास्त्रानुसार कोणत्या रुग्णाला किती प्रोटीन, न्यूट्रेशियन हवे त्यानुसार त्याचा आहार निश्चित करण्याची गरज असते. त्यासाठी आहार तज्ज्ञाला विशेष प्रशिक्षण दिलेले असते. त्यामुळे प्रत्येक रुग्णालयात आहार तज्ज्ञांची गरज आहे. – रेखा शर्मा, अध्यक्ष, न्यूट्रेशियन सोसासटी ऑफ इंडिया, नागपूर शाखा.

Story img Loader