अमरावती : जिल्ह्यासाठी निश्चित केलेल्या एकूण ४४ वाळूघाटांच्‍या १४ वाळू डेपोंसाठी निविदा प्रक्रिया राबविण्‍यात आली खरी, पण केवळ धामणगाव रेल्‍वे तालुक्‍यातील मौजे जळगाव मंगरूळ येथील वाळू डेपो कार्यान्वित करण्‍यात आला असून इतर ठिकाणी वाळू डेपो सुरू होण्‍याची प्रतीक्षाच आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्यातील सर्वसामान्यांसाठी स्वस्त दरात वाळू उपलब्ध करून देण्याच्या धोरणात्मक निर्णयानुसार ६०० रुपये प्रती ब्रास दरात वाळू उपलब्ध होणार असल्‍याची घोषणा महसूल मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केली होती. पण, गेल्‍या वर्षी जिल्‍ह्यात स्‍वस्‍त वाळू उपलब्‍ध होऊ शकली नाही. नो‍व्‍हेंबर महिन्‍यात वाळू डेपोंसाठी निविदा प्रक्रिया राबवली गेली, त्‍यातही अनेक अडथळे उभे झाले. ११ ठिकाणी वाळू डेपोंसाठी तीन किंवा त्यापेक्षा जास्त निविदा प्राप्त झाल्या नाहीत, त्‍यामुळे वाळू डेपो सुरू करता येऊ शकले नाहीत.

शासनाने वाळूचे उत्खनन, साठवणूक व ऑनलाईन प्रणालीद्वारे विक्री करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार धामणगाव रेल्वे तालुक्यातील मौजे जळगाव मंगरूळ येथील वाळूडेपो कार्यान्वित करण्यात आला असून जवळच्या सेतू केंद्रावर किंवा वेबसाईटवर वाळू नोंदणी सुरु झाली आहे, अशी माहिती खनिकर्म विभागाकडून देण्‍यात आली.

वाळू नोंदणी करण्यासाठी संबंधित संकेतस्‍थळावर कार्यप्रणाली उपलब्ध करुन देण्यात आली आहे. प्रतिब्रास रक्कम ६०० रूपये, जिल्हा खनिज प्रतिष्ठान रक्कम ६० रूपये तसेच महाखनिज इटीपी चार्ज रक्कम १६.५२ रूपये असे एकूण ६७६.५२ रूपये प्रतिब्रास शासकीय शुल्‍क असून वाळूची आपल्या बांधकामापर्यंत वाहतुकीचा खर्च नागरिकांना स्वत: करावा लागणार आहे. प्रधानमंत्री आवास योजना व इतर राज्य पुरस्कृत आवास योजनेंतर्गत घरकुल बांधकामासाठी ५ ब्रास पर्यंत वाळू रेती विनामुल्य प्राप्त करता येईल. तथापि, वाळू रेतीच्या वाहतुकीच्या खर्च संबंधित लाभार्थ्यांस करावा लागेल, असे सांगण्‍यात आले आहे.

सद्यस्थितीत जिल्ह्यात धामणगाव रेल्वे तालुक्यातील मौजे जळगाव मंगरूळ येथील वाळूडेपो कार्यान्वित झालेला असून तिवसा तालुक्‍यातील चांदूर ढोरे, धामंत्री, फत्तेपूर जावरा, भातकुली तालुक्‍यातील नावेड आणि अचलपूर निंभारी येथील वाळूडेपो सुध्दा कार्यान्वित करण्याची प्रक्रीया सुरू आहे. डेपो कार्यान्वित झालेनंतर त्यामधून सुध्दा वाळू प्राप्त करता येईल.
-डॉ. इम्रान शेख, जिल्‍हा खनिकर्म अधिकारी

हेही वाचा : ठाणे : भरारी पथकांची निष्क्रियता वाळू माफियांच्या पथ्यावर, जिल्ह्यात सर्वत्र दिवस रात्र अवैध वाळू उपसा

नियमाने जून महिन्यात वाळू घाट बंद होतात मात्र, अनेकदा जिल्ह्यातून नाही तर जिल्ह्याबाहेरून वाळू उपलब्ध होत असल्यामुळे बांधकामे सुरू राहतात. सध्‍या जिल्‍ह्यातील वाळू घाटांवरून वाळू उपलब्‍ध नसल्‍याने नवीन बांधकाम करणाऱ्या सर्वसामान्यांसह बांधकाम व्यावसायिकांनाही प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या वाळू उपलब्ध नाही, जी काही थोड्या प्रमाणात आहे, त्यासाठी बेभाव पैसे मोजावे लागत आहेत. यामुळे अनेकांचे बांधकाम रखडले आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Only one sand depot to get cheap sand in amravati district mma 73 pbs