एक एक करून गडचिरोली जिल्ह्यातील हत्ती गुजरातला हलविण्यात येत आहे. तरीही या भागातील लोकप्रतिनिधी कृती करण्याऐवजी केवळ माध्यमांना प्रतिक्रिया देण्यात धन्यता मानत असल्याने नागरिकांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे. समजमाध्यमांवर या नेत्यांवर मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे.
हेही वाचा >>> गडचिरोली : जिल्हाधिकाऱ्यांच्या असंवेदनशीलतेने घेतला आदिवासी शेतकऱ्याचा बळी ! ; सूरजागड लोहप्रकल्पातील गाळामुळे शेती उद्ध्वस्त
मे महिन्यात ताडोबा, पातानील आणि कमलापूर येथून १३ हत्ती गुजरात जामनगरच्या राधा कृष्ण एलिफन्ट वेलफेअर ट्रस्टला हस्तांतरित करण्याबाबत वन विभागाकडून आदेश काढण्यात आले होते. त्यावेळेस वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार धर्मरावबाबा आत्राम व खासदार अशोक नेते यांनी हत्ती कुठेही जाऊ देणार नाही, असे आश्वासन दिले होते. मात्र, झाले उलट आणि ताडोबा येथून ६ हत्ती गोपनीय पद्धतीने नेण्यात आले. तीन दिवसांपूर्वीदेखील अशाच पद्धतीने मध्यरात्री १२ च्या सुमारास पातानील येथील ३ हत्ती हलविण्यात आले. नेते केवळ बघत राहिले. त्यांनी दिलेले आश्वासन हवेत विरले. याविरोधात आता जिल्हाभरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. ‘हत्ती नेण्यात आले तेव्हा तुम्ही झोपून होतात काय, असे प्रश्न प्राणीप्रेमी नागरिक व युवक समाजमाध्यमावर उपस्थित करत आहेत.