नागपूर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचा निर्णय

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात नोंदणी झालेले नंतर गोंडवाना विद्यापीठात शिकवले जाणारे उपकरणशास्त्र अभियांत्रिकी आणि खनिकर्म अभियांत्रिकी या दोन्ही अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना यापुढे परीक्षा देण्याच्या दोनच संधी उपलब्ध होणार आहेत. तरीही विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास त्यांना त्या त्या विद्यापीठातील विद्यमान परीक्षा पद्धतीनुसार परीक्षा द्यावी लागेल.
चंद्रपूरचे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय आणि राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयातच हे दोन्ही अभ्यासक्रम शिकवले जातात. सध्या ही महाविद्यालये गोंडवाना विद्यापीठात आहेत. या अभ्यासक्रमांतर्गत गोंडवाना विद्यापीठाच्या स्थापनेपूर्वीच्या प्रवेशित पहिल्या ते चौथ्या सत्राच्या माजी विद्यार्थ्यांच्या परीक्षा देण्याच्या सर्व संधी संपलेल्या आहेत. पाचव्या सत्राच्या विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची अंतिम संधी ही हिवाळी २०१५ आहे. हा अभ्यासक्रम नागपूर विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या कोणत्याही महाविद्यालयांमध्ये शिकवला जात नसल्यामुळे या अभ्यासक्रमाचे ‘सीबीएस’चे अभ्यासक्रम नागपूर विद्यापीठाच्या अभ्यास मंडळ व विद्याशाखेने तयार केलेले असले तरीही विशेष बाब म्हणून पहिल्या ते पाचव्या सत्रामधील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना हिवाळी २०१५ व उन्हाळी २०१६ (सीबीएस पॅटर्न नसलेला) अशा परीक्षा देण्याच्या दोन संधी दिल्या जाणार आहेत.
त्यानंतर विद्यार्थ्यांना गोंडवाना विद्यापीठामधून त्यांच्या उपलब्ध असलेल्या अभ्यासक्रमानुसार त्यांची पदवी पूर्ण करणे क्रमप्राप्त राहील. तसेच गोंडवाना विद्यापीठांतर्गत समाविष्ट असणाऱ्या इतर अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील उपकरणशास्त्र अभियांत्रिकी आणि खनिकर्म अभियांत्रिकी हे अभ्यासक्रम वगळून इतर अभ्यासक्रमातील पहिल्या ते पाचव्या सत्राच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना नागपूर विद्यापीठाच्या सीबीएस पॅटर्नमध्ये सामावून घेण्याच्या योजनेनुसार परीक्षा देण्याची अंतिम संधी हिवाळी २०१५ आणि उन्हाळी २०१६ राहील. वरील उपलब्ध असलेल्या संधींमध्ये जे विद्यार्थी उत्तीर्ण होऊ शकणार नाहीत, अशा विद्यार्थ्यांकरिता कोणत्याही प्रकारच्या अतिरिक्त संधी उपलब्ध करून देण्यात येणार नाहीत. त्यानंतर विद्यार्थ्यांना विद्यापीठामधून त्यांच्या उपलब्ध असलेल्या अभ्यासक्रमानुसार त्यांची पदवी पूर्ण करणे क्रमप्राप्त राहील.
त्याचप्रमाणे उपरोक्त दोन्ही अभ्यासक्रमाच्या सहाव्या ते आठव्या सत्राच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची १३ सप्टेंबर २०१३ची अधिसूचना लागू राहील.  उपलब्ध करून दिलेल्या संधीमध्ये जे विद्यार्थी उत्तीर्ण होऊ शकणार नाहीत, अशा विद्यार्थ्यांकरिता कोणत्याही प्रकारच्या अतिरिक्त संधी उपलब्ध करून देण्यात येणार नाहीत.
इतर सर्व विद्याशाखांच्या अभ्यासक्रमाच्या नियमित विद्यार्थ्यांकरिता नागपूर विद्यापीठाने अंतिम परीक्षेपासून तीन संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतरही अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यापीठ कोणतीही अतिरिक्त संधी उपलब्ध करणार नाही. त्या विद्यार्थ्यांना गोंडवाना विद्यापीठामधून उपलब्ध असलेल्या अभ्यासक्रमानुसार पदवी पूर्ण करावी लागेल, असा निर्णय नागपूर विद्यापीठाच्या विद्वत परिषद आणि व्यवस्थापन परिषदेच्यावतीने घेण्यात आला आहे.

Story img Loader