प्रसूतीसाठी दाखल करण्यात आलेल्या पत्नीकडे डॉक्टर व परिचारिका लक्ष का देत नाहीत, असे विचारल्याने गर्भवतीला वार्डातून हाकलून देण्यात आल्याचा आरोप एका दाम्पत्याने केला आहे. वार्डाबाहेर काढल्यानंतर या गर्भवतीची उघड्यावर प्रसूती झाली. हा धक्कादायक आणि संतापजनक प्रकार येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शनिवारी सकाळी घडला. या प्रकाराबद्दल सर्व स्तरातून संताप व्यक्त होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- विदर्भातही ‘एक्सबीबी’ उपप्रकाराचे करोनाग्रस्त; नागपूर, भंडारा, अकोल्यात नोंद

नेर तालुक्यातील बाळेगाव झोंबाडी येथील प्रतीक्षा सचिन पवार (२२) या विवाहितेस प्रसूती कळा सुरू झाल्यामुळे पतीने शुक्रवारी रात्री १०८ रुग्णवाहिकेने तिला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणले. वार्ड क्र. तीनमध्ये तिला दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी प्रतीक्षाला रक्त देण्याची गरज असल्याचे सांगून तिच्या पतीला खासगी ब्लड बॅंकेतून रक्त पिशवी आणण्यास सांगितले. आर्थिक स्थिती नसतानाही सचिन पवार याने पत्नीसाठी एक हजार ६०० रुपये देऊन रक्ताची पिशवी आणली. ही रक्ताची पिशवी घेऊन तो पहाटे ४.३० वाजता स्त्रीरोग विभागात पोहोचला. मात्र, तोपर्यंत तेथील डॉक्टर व नर्सेस यांनी प्रतीक्षाची साधी तपासणीही केली नव्हती. तसेच रक्ताची पिशवी दिल्यानंतरही रक्त लावण्यात आले नाही. याची विचारणा केली असता, सचिन व त्याच्या पत्नीला शिवीगाळ करीत वार्डातून हाकलून देण्यात आले. रक्ताची पिशवीही त्यांच्या अंगावर भिरकावली, असा आरोप सचिनने केला आहे.

हेही वाचा- बिबट्यांच्या लढाईत वाघाची “एन्ट्री” अन्……

पत्नीला घेऊन सचिन शासकीय रुग्णालय परिसरातच थांबला. सकाळी ८.३० वाजता प्रतीक्षाने उघड्यावर बाळाला जन्म दिला. उघड्यावर प्रसूती होत असल्याने, परिसरातील नागरिक तिच्या मदतीला धावून आले. मात्र, वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाच्या काळजाला पाझर फुटला नाही. प्रतीक्षाने स्वत:च्या हाताने बाळाची नाळ तोडली. प्रसूतीनंतर ही महिला पतीसह गावी निघून गेली. प्रतीक्षाची ही दुसरी प्रसूती होती. प्रसूती वार्डाच्या विभाग प्रमुख रजेवर असल्याने हा प्रभार डॉ. रोहिदास चव्हाण यांच्याकडे होता. त्यांनी सुद्धा रुग्णाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे.
वैद्यकीय महाविद्यालयात ग्रामीण भागातून येणाऱ्या रुग्णांच्या सोयीसाठी पालकमंत्री संजय राठोड यांनी येथे स्वतःची समांतर मदत यंत्रणा उभारली आहे. मात्र राठोड सत्तेत आल्यापासून ही यंत्रणाही सुस्त आहे. त्यामुळे रुग्णालयातील सुविधांकडे ‘रुग्णसेवक’ पालकमंत्र्यांचेही आता दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे.

हेही वाचा- नागपूर: पुन्हा चार ‘स्वाईन फ्लू’ग्रस्तांच्या मृत्यूवर शिक्कामोर्तब

‘ती’ गर्भवती महिला स्वतःच गेली, आरोप तथ्यहीन

वैद्यकीय महाविद्यालयात प्रसूतीसाठी आलेल्या गर्भवती महिलेस वार्डातून हाकलून लावल्याचा आरोप तथ्यहीन असल्याचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीक्षक डॉ. सुरेंद्र भुयार यांनी सांगितले. ती महिला मला येथे राहायचे नाही असे म्हणून स्वतःच वार्डातून निघून गेली. बाहेर पडल्यानंतर प्रसूती कळा वाढल्याने तिथेच तिचे बाळंतपण झाले. रुग्णाच्या नातेवाईकांकडून महाविद्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांवर तथ्यहीन आरोप करण्यात येत असल्याचे डॉ. भुयार म्हणाले.