नागपूर : आता आपल्या मराठी खाद्य संस्कृतीमध्येदेखील अनेक बदल झाले आहेत. त्यामुळे सध्या पाश्चात्य पदार्थांबाबत नव्या पिढीला असलेला मोह फार काळ टिकणार नाही. ते नक्कीच पुन्हा आपल्या पारंपरिक पदार्थाकडे वळतील, असे मत प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी व्यक्त केले. प्रत्येक सणवाराला केला जाणाऱ्या विशिष्ट पदार्थाला शास्त्रीय आधार असल्याचा दावाही त्यांनी केला. लोकसत्ता कार्यालयाला दिलेल्या सदिच्छा भेटीदरम्यान ते बोलत होते.
विष्णू मनोहर म्हणाले, नवीन पिढीला प्रत्येक गोष्टीत बदल हवे असतात. त्यातून खाद्य संस्कृतीही सुटली नाही. घरोघरी पारंपरिक पदार्थ केले जात असले तरी नव्या पिढीला त्यातही बदल हवे आहेत. त्यातूनच फास्ट फूड आलेआता चौकाचौकात हवे ते पदार्थ विकत मिळतात. त्यात पाश्चात्य पदार्थांची संख्या जास्त आहे. मात्र त्यांचा सतत आस्वाद घेतला तर ते कालांतराने नकोसे वाटतात. त्यामुळे आजचे फास्ट फूड वाईट नसले तरी ते फार काळ टिकणारे नाही. विदेशात सुद्धा भारतीय पदार्थांना चांगली मागणी असून ते तिकडच्या लोकांनी पोषक आहार म्हणून स्वीकारले आहेत.
महाराष्ट्रीयन आहार सर्वात योग्य व संतुलित आहे. पूर्वी ऋतू, हवामान, सणवाराला अनुसरूनच खाद्यपदार्थ तयार केले जात होते. त्याला शास्त्रीय आधार आहे. एखाद्या पदार्थ एखाद्या ऋतूमध्ये खायचा नाही असे जर ठरवले तर त्याला आज फारसा प्रतिसाद मिळणार नाही. मात्र त्याला धार्मिक कारणाची जोड दिली तर त्यातील काही लोक ते स्वीकारतील. वेगवेगळ्या रूढी, पद्धती पूजा पाठ यांना खाण्याचे नियम त्याकाळी जोडले गेले. म्हणून ते पाळले तरी जात होते. ऊन, पाऊस. थंडी, वारा यांना अनुसरून व शरीराला चालेल, आवडेल असे खाद्यपदार्थ घरी केले जात होते.
गणेशोत्सवात मोदक, होळीला पुरणपोळी, महालक्ष्मी पूजनाला पूर्वी सोळा प्रकारच्या भाज्या, आंबील, सोळा चटण्या केल्या जात होत्या. पंक्ती बसायच्या. आता मात्र त्यात बदल झाला आहे. सोळा भाज्या मिळून एक भाजी केली जाते. पंक्तीच्या जागी बुफे आले व त्याला नवीन पिढीसोबत जुन्या पिढीनेही स्वीकारले. मात्र त्यातही पारंपरिक पदार्थ करण्याचे प्रमाणे कमी झाले नाही, असेही विष्णू मनोहर म्हणाले.मराठी खाद्य संस्कृती म्हणजे रोज साधेपणाचे समतोल परिपूर्ण भोजन. सणासुदीला गोडधोड. तेही गुळापासून बनवलेले, पावसाळ्यात उकडीचे पदार्थ तर हिवाळ्यात तिळाचे पदार्थ, थोडे तळलेले पदार्थ, सुकामेवा, तुपाचे, उन्हाळ्यात भरपूर पेयप्रकार असतात.
हेही वाचा : दसरा मेळाव्याला राज ठाकरेंना बोलावणार का? एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले…
कालानुरूप सणांचे स्वरूप बदलत चालले आहे. शहरातले जीवन धावपळीचे, धकाधकीचे झाले आहे. पारंपरिक सण साजरे करीत बसायला लोकांजवळ वेळ उरला नाही. त्यामुळे सण आटोपता साजरा करण्याकडे बहुंताश लोकांचा कल आहे. गणेशोत्सव, नवरात्र, महालक्ष्मी पूजन, दिवाळी आदी सण उत्साहात पुढच्याही काळात साजरे होतील. मात्र मात्र पूर्वीसारखी खाद्यपदार्थाची व खाण्याची चंगळ राहणार नाही.
चमचमीत, तिखट पदार्थांसाठी विदर्भ प्रसिद्ध
चमचमीत व तिखट खाण्याबाबत विदर्भाची प्रसिद्धी सगळीकडे पसरली आहे. वैदर्भीय लोक जेवण्याच्या बाबतीत अतिशय आग्रही. आदरातिथ्याचा गुण तर सर्वश्रूतच आहे. विदर्भातील जेवण म्हणजे जहाल तिखटच असे कित्येकांना वाटत असते पण तसे नाही. काही विशिष्ट वर्गातले लोक तिखट खातात मात्र कमी तिखटाचे सावजी पदार्थ तयार करता येतात. मात्र, इथला सुविख्यात असा सावजी हा प्रकार तिखटच असतो आणि तो केवळ विदर्भातील राहिला नाही. तो आता जगातील लोकांनी स्वीकारला आणि आता त्याचा आवडीने आस्वाद घेतात. विदेशात मेक्सीकन फूडला चांगली मागणी असली तरी भारतीय पदार्थाचीही मागणी होते. मात्र विदेशात आज भारतीय पदार्थ कशाबरोबर काय खावे हे कळत नाही. अनेकदा चिकनवर ते पाताळ भाजी टाकून खात असतात.
आंतरराष्ट्रीय धान्य वर्ष
२०२३ हे आंतरराष्ट्रीय धान्य वर्ष म्हणून साजरे केले जाणार असून त्या दृष्टीने ज्वारी, बाजरी, रागी आणि अन्य छोट्या खाद्यबियांचा उपयोग करण्याच्या दृष्टीने जनजागृती केली जात आहे. यासाठी वेगवेगळ्या कुकरी शोमधून सांगितले जाणार आहे. या सर्व पदार्थातून कॅल्शियम, प्रोटीन मिळत असल्यामुळे समाजातील गोर गरीब लोकांना सुद्धा याचा फायदा होईल, असेही मनोहर यांनी सांगितले.