अकोला: उन्हाळ्यात समाजमन सुसंस्कारीत होण्यासाठी कथा, पुराणे, भजन-कीर्तन प्रवचन आदी धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असते. अध्यात्माला विज्ञानाची जोड मिळाली तर भविष्य अधिक उज्ज्वल असेल. अवकाशात देखील एक ज्ञानयज्ञ ९ ते १५ मार्च या कालावधीत होत आहे, अशी माहिती खगोल अभ्यासक प्रभाकर दोड यांनी दिली.
आकाश मध्याशी वृषभ राशीतील रोहिणी जवळ गुरु, मिथुन राशीत चंद्र, मंगळ ग्रहाची युती, पूर्व क्षितिजावर सिंह राशी, उत्तरे कडील सप्तर्षीचे प्रमुख उपस्थितीत मृग नक्षत्र व सर्वात तेजस्वी व्याध ताऱ्याचे दर्शन ९ मार्चला सायंकाळी घेता येईल.सुनिता विल्यम्स गत नऊ महिन्यांपासून असलेल्या आंतरराष्ट्रीय अवकाश संशोधन केंद्र साायंकाळी ७.१२ ते ७.१७ या वेळेत दक्षिणेकडून पूर्वेस फिरत्या चांदणीच्या स्वरूपात नुसत्या डोळ्यांनी दिसेल.
सोमवारी पहाटे ५.०६ ते ५.०९ या वेळी संशोधन केंद्र उत्तर ते दक्षिण आकाशात वरच्या भागात आणि पुन्हा रात्री ८.०१ ते ८.०५ या वेळी पश्चिम ते उत्तर ध्रुवाकडे जाताना पाहता येईल. उत्तर ध्रुव तारा व दक्षिण आकाशात रंगीन अगस्त्य तारका सहज बघता येतील. ११ ला पश्चिम आकाशात तेजस्वी शुक्र आणि बुध ग्रहाची युती बघण्याची अनुभूती एक अनोखी पर्वणी ठरेल. लवकर न दिसणारा बुध ग्रह शुक्राच्या डाव्या बाजूला अगदी जवळ असेल.
याच दिवशी रात्री ७.१२ ते ७.१९ या वेळी अंतराळ केंद्र पश्चिम ते उत्तर बाजूला बघता येईल. १२ ला चौथ्या दिवशी चंद्र हा सिंह राशीत मघा नक्षत्रात, तर खाली दोन तारकांचे पूर्वा फाल्गुनी व उत्तरा फाल्गुनी नक्षत्र छान बघता येईल. १३ ला होळी पौर्णिमेला चंद्र फाल्गुनी नक्षत्रात आहे. १४ चे खंडग्रास चंद्रग्रहण भारतीयांना प्रत्यक्ष नभांगणात दिसणार नाही. याच दिवशी सूर्य कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करेल, असे दोड यांनी सांगितले.
नव्या रुपात नटलेल्या….
या आकाश यज्ञ सप्ताहाची सांगता १५ मार्चला बुध ग्रह वक्री व शुक्र सूर्य भेटायला आतुर असेल. रात्रीच्या प्रारंभी पूर्व क्षितिजावर नव्या रुपात नटलेल्या कन्या राशीतील चित्रा तारका पुन्हा एकदा आकाशातील नवे चित्रांगण दर्शनार्थ सज्ज असेल. या आकाश पर्वणीचा आनंद घेण्याचे आवाहन प्रभाकर दोड यांनी केले आहे.