लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर: गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुषंगाने केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद बुधवारी अधिवेशनात विधिमंडळ परिसरात उमटले. शहा यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेत ‘भाजपच्या पोटातील ओठावर आले’, अशी टीका विरोधकांनी केली.

‘सध्या आंबेडकर, आंबेडकर म्हणायची फॅशन झाली आहे. एवढे देवाचे नाव घेतले असते तर सात जन्मांसाठी स्वर्ग मिळाला असता’, असे वक्तव्य गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत केले. त्या वक्तव्याचा देशभरातून निषेध करण्यात येत आहे. विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही विरोधकांनी अमित शहा यांच्या वक्तव्याचा निषेध करत भाजप आणि संघावर टीका केली. यासंदर्भात अधिक बोलताना विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले,‘आम्ही लोकसभेच्या निवडणुकीपासून सरकार संविधान बदलणार हे सांगतोय. आज त्यांच्या पोटातील ओठावर आले आहे. आम्ही गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याचा निषेध करतो.’

आणखी वाचा-२३ व्या वर्षी ‘लेफ्टनंट’पदी नियुक्ती, यवतमाळचा तन्मय सर्वात कमी वयाचा…

काँग्रेसचे आमदार भाई जगताप म्हणाले,‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुषंगाने असे वक्तव्य करणे दुर्दैवी आहे. तसेच ईव्हीएम देवीच्या आशीर्वादाने सत्तेत आलेल्या सरकारच्या डोक्यात सत्तेचा माज गेला आहे. त्यातूनच अशी वक्तव्ये करण्यात येत आहे. हा माज लोकशाहीला मारक आहे. हा खरा संघ आणि भाजपचा चेहरा आहे.’ काँग्रेसेच ज्येष्ठ नेते नाना पटोले म्हणाले,‘आंबेडकरांबद्दल भाजपच्या मनात असलेला राग या वक्तव्यातून दिसून आला आहे. यापूर्वीदेखील अशा स्वरूपाची वक्तव्ये भाजपने केली आहेत. आम्ही त्याचा निषेध करतो.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Opposition criticizes amit shah for controversial statement about dr babasaheb ambedkar in nagpur session mnb 82 mrj