नागपूर : भाजपाच्या गुजरात विकास मॉडेलची टिंगल करताना मागील लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षांनी ‘विकास गांडो थयो छे’ (विकास वेडा झाला आहे) असे विडंबन केले होते. त्यावेळी ते समाजमाध्यमात खूप व्हायरलं झाले होते. आता तेच वाक्य नागपुरातील काँग्रेस नेते वापरताना दिसत आहेत. त्याचे नेमके कारण काय जाणून घेऊया.
नागपूर महापालिकेत भाजपाची सलग १५ वर्षे सत्ता होती. सध्या येथे प्रशासक आहे. हे शहर चोवीस पाणीपुरवठा योजना, सिमेंट रस्ते यासाठी देशात प्रसिद्धीला आले. पण अजूनही एखादा झोन सोडला तरी कुठेही चोवीस तास पाणीपुरवठा होऊ शकला नाही. सिमेंट काँक्रिट रस्तेदेखील काही निवडक भागात झाले असून शहराच्या मोठ्या भागात रस्त्यावर खड्डे आहेत.
हेही वाचा – नागपूर: सत्यपाल महाराजांना कर्मश्री दुर्गादास रक्षक स्मृती पुरस्कार घोषित
आता विकासाचा आणखी एक प्रकार समोर आला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघातील जयताळा भागात सिमेंट काँक्रिटचा रस्ता तयार करण्यात आला. त्यांच्या बाजूला गट्टू बसवण्यात आले आहे. यामध्ये अस्तित्वात असलेली विंधन विहीर (बोअरवेल) गट्टू लावून दाबून टाकण्यात आली आहे. विकास इतका झाला की बोअरवेलदेखील काम करीत नाही. यालाच ‘विकास गांडो थयो छे’ असे म्हणतात, अशी टीका राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वेदप्रकाश आर्य यांनी केली.