गडचिरोली : सरकारकडून गडचिरोलीच्या विकासाबाबत करण्यात येणारा दावा हा केवळ आकड्यांचा खेळ असून प्रत्यक्षात स्थिती भयावह आहे. येथील रस्ते,आरोग्य आणि रोजगाराची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. सूरजागड लोहप्रकल्पात स्थानिकांना रोजगार नाही. यातून केवळ मूठभर लोकांचा फायदा केल्या जात आहे. असा गंभीर आरोप विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषदेत केला. गडचिरोली दौऱ्यावर आले आसता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> नागपूर : तातडीने अर्ज न भरल्यास वाढीव निवृत्ती वेतनाचा लाभ नाही; विधि सल्लागार दादा झोडे यांची माहिती

सत्ता परिवर्तनानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे पहिल्यांदाच गडचिरोली दौऱ्यावर आले. यावेळी त्यांनी जिल्हा रुग्णालय, आदिवासी मुलांच्या वसतिगृहाला भेट दिली. सोबतच जिल्हाधिकारी कार्यालयाला बैठक घेत सूरजागड लोह प्रकल्पाची स्थिती जाणून घेतली. पत्रपरिषदेत दानवे यांनी सरकारच्या भूमिकेवर शंका उपस्थित करून सूरजागड लोह प्रकल्पातील रोजगाराची सद्यस्थिती सर्वांसमोर मांडली. यात सरकारने हिवाळी अधिवेशनात जो रोजगाराचा दावा केला होता. त्याची पोलखोल करीत या प्रकल्पात एकाही स्थानिकाला कायमस्वरूपी रोजगार मिळाला नसल्याचे सांगितले. जिल्ह्यात खनिज संपत्तीची लूट चालू आहे. यावर कुणाचे नियंत्रण नाही. लोहखनिज कोण, कुठे नेत आहे. हे तपासणी करणारी यंत्रणाच अस्तित्वात नाही. यावरून हा प्रकल्प केवळ मूठभर लोकांना फायदा पोहोचविण्यासाठी सुरू करण्यात आला काय अशी शंका दानवे यांनी उपस्थित केली. यावेळी त्यांनी रस्ते आणि आरोग्य व्यवस्थेवर देखील चिंता व्यक्त केली. जिल्हा रुग्णालय असून देखील येथे  ‘एमआरआय’ मशीन उपलब्ध नाही. रुग्णांना तपासणी करण्यासाठी इतर जिल्ह्यात जावे लागते. २१२ गावांना जोडणारा रस्ताच नाही.

हेही वाचा >>> नागपूर : भाजपकडून विरोधी पक्षातील कुणबी-मराठा समाजाचे नेते लक्ष्य; पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन कारवाई

बनावट दारूची सर्रास तस्करी सुरू आहे. वनहक्क दावे नामंजूर करण्याचे प्रमाण जास्त आहे. मंत्री नेहमी गडचिरोलीच्या विकासाच्या बाबतीत जो दावा करतात प्रत्यक्षात तसे काहीच नाही. असा दावा दानवे यांनी यावेळी केला. पत्रपरिषदेला जिल्हा संपर्क प्रमुख किशोर पोद्दार, जिल्हाप्रमुख वासुदेव शेडमाके, महिला आघाडी प्रमुख छाया कुंभारे, अरविंद कात्रटवार उपस्थित होते.

सूरजागड येथील रोजगारावर दिशाभूल बहुचर्चित सूरजागड लोहप्रकल्पात मोठ्या प्रमाणात रोजगार मिळाल्याचा दावा शासन, प्रशासन करीत आहे. मात्र, प्रत्यक्षात एकाही स्थानिकाला कायमस्वरूपी रोजगार मिळालेला नाही. असा दावा दानवे यांनी केला आहे. त्यांनी यावेळी आकडेवारी दिली यावरून सद्य:स्थितीत ५०२१ रोजगार उपलब्ध आहे. त्यात ३४४५ जणांना कंत्राटी तत्वावर घेण्यात आले. तर ८८ जणांना कायमस्वरूपी रोजगार देण्यात आले आहे. यात एकही स्थानिक व्यक्ती नाही. केवळ ५१३ स्थानिकांना साफसफाई आणि चौकीदार असा तात्पुरत्या स्वरूपात रोजगार देण्यात आला. यावरून सरकार रोजगाराच्या नावावर दिशाभूल करीत असल्याचे स्पष्ट झाले,असा आरोप दानवे यांनी केला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Opposition leader ambadas danve allegations on shinde fadnavis government over gadchiroli development ssp 89 zws