नागपूर : राज्यात अवकाळी आणि दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या डोळयातून अश्रू वाहत असताना सत्ताधारी मात्र शेजारील राज्यात प्रचारात मग्न होते. पीक विमा योजनेत वाटा मिळत असल्याने सरकार विमा कंपन्यांचे लाड करीत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी विधानसभेत केला.
अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी सरकारने भरीव मदत जाहीर करून त्याला कर्जमुक्त करण्याची मागणी सत्ताधारी आणि विरोधकांनी केली. विधानसभेत विरोधक आणि सत्ताधारी पक्षाने राज्यातील दुष्काळी परिस्थितीबाबत चर्चा उपस्थित केली होती. त्यावर सत्ताधारी आणि विरोधकांनी दुष्काळ, पाणीटंचाई, अवकाळी पाऊस, गारपीट, पिकविमा कंपन्यांची मुजोरी, निर्यात बंदीचा फटका, बोगस बियाणे आणि शेतकऱ्यांना मदतीच्या मुद्दयावरून सरकारला घेरले. सरकारने ज्या ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे ते सत्ताधारी आमदारांचे असून त्यातील २९ तालुके मंत्र्यांचे आहेत. सरकारने तोंड पाहून दुष्काळ जाहीर केल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला.
हेही वाचा >>> उदय सामंत यांच्यावर शिवसैनिकांची जाहीर नाराजी
या संकटातून बळीराजाला बाहेर काढण्यासाठी सरकारने बळीराजाला कर्जमुक्त करावे, ४० दुष्काळी तालुक्यांप्रमाणे टंचाईसदृश परिस्थिती जाहीर करण्यात आलेल्या एक हजार २१ महसुली मंडळांना लाभ द्यावेत, पिकाच्या वर्गवारीनुसार मदत देताना जिरायतीसाठी हेक्टरी ५० हजार तर बागायतीसाठी हेक्टरी एक लाख रुपयांची मदत करावी, शेतकऱ्यांना बिनव्याजी पीक कर्ज द्यावे, वीज बिल माफ करावे, राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करावा, पिकविम्याची मदत द्यावी आदी मागण्या यावेळी वडेट्टीवार यांनी हा प्रस्ताव मांडताना केल्या.
तिसऱ्या इंजिनामुळे त्रास वाढला -जयंत पाटील
राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांनी सरकारवर टीकेची झोड उठवताना डबल इंजिन सरकारला तिसरे इंजिन जोडल्यामुळे महायुतीची गाडी सुसाट धावेल अशी अपेक्षा होती. मात्र तिसऱ्या इंजिनमुळे सरकारचा त्रास वाढल्याचे सांगितले. पीक विमा कंपन्या नफा कमावण्यासाठी आहेत. हा धंदा बंद करून शासनाची कंपनी स्थापन करण्याची मागणी भाजपचे रणधीर सावरकर यांनी केली. पोकरा योजना अतिशय चांगली, पण त्यात लोकप्रतिनिधींचे मत घेतले जात नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. बच्चू कडू यांनी सरकारला पाठिंबा दिला ही चूक झाली असे सांगत सरकारवर टीका केली.