लोकसत्ता टीम
बुलढाणा : राज्यातील महायुती सरकारच्या स्थापनेतच घोळ असल्याने घोळ, गैरव्यवहार हा या सरकारसाठी परवलीचा शब्द ठरला आहे. सरकारी तिजोरीची अक्षरशः उधळपट्टी सुरू असून युतीचे सरकार भ्रष्टाचारात आकंठ बुडाल्याची जहाल टीका काँग्रेसचे विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात आणि विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर केली आहे.
बुलढाणा येथील काँग्रेसच्या विधानसभा पूर्वतयारी बैठकीसाठी काँग्रेसचे हे दिग्गज नेते बुलढाणा शहरात आले. यावेळी प्रसिद्धी माध्यम प्रतिनिधी समवेत संवाद साधताना राज्यातील महायुती सरकारवर टीकेचा भडिमार करीत गंभीर आरोप केले. बाळासाहेब थोरात यांनी या खोकेबाज सरकारच्या स्थापनेतच घोळ असल्याचे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महा भ्रष्टाचाराचे आरोप केल्यावर अजित पवार चारच दिवसात सत्तेत सहभागी होऊन उपमुख्यमंत्री झाले. राज्य सरकारच्या कार्यकाळात सरकारी तिजोरीची उधळपट्टी करण्यात येत असून कायदा सुव्यवस्थाची लक्तरे वेशीला टांगल्या गेली आहे.
आणखी वाचा-सुप्रिया सुळेंना मुनगंटीवारांचा टोला, म्हणाले “माविआ सरकार होतं तेव्हा..”
सर्वच आघाडीवर अपयशी ठरल्याने आता विधानसभेच्या तोंडावर, सत्ताधाऱ्यांना लाडक्या बहिणींचा पुळका आला आहे. मात्र, सरकारचा हेतू शुद्ध नसून त्यांना बहिणी लाडक्या नाही तर सत्ता लाडकी आहे. त्यासाठी त्यांनी निवडणुकीच्या तोंडावर विविध योजनांचा धडाका लावला असल्याचे थोरात यावेळी म्हणाले.स्वायत्त संस्था पायदळी तुडवून हुकूमशाही पद्धतीने काम करणाऱ्यांना महाराष्ट्रातील जनतेने लोकसभा निवडणुकीत धडा शिकविला, आता विधानसभेतही महायुती सरकारची जनता जनार्दन अशीच गत करणार असल्याचा दावा या ज्येष्ठ नेत्याने बोलून दाखविला.
स्वतःच्या बहिणीला पाडण्यासाठी बायकोला विरोधात उभे केले – वडेट्टीवार
माध्यमांसोबतचा हा संवाद विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी अधिकच रंजक केला. आज जिजाऊंच्या जिल्ह्यात आलो असल्याचे सांगून युती सरकारकडे सिंदखेडराजा विकास आराखडा मंजुरीसाठी अनेक महिन्यापासून रखडला आहे. अरबी समुद्रातील शिवस्मारक चे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले, पुढे काहीच झाले नाही. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल मधील प्रस्तावित स्मारकाच्या कामाची अशीच गत या राज्य सरकारने केली आहे. या महापुरुषांबद्धलचे युतीचे प्रेम बेगडी असल्याचा घणाघात वडेट्टीवार यांनी यावेळी केला.
आणखी वाचा-वडिलांचे निधन, आई अंथरूणावर, बहीण-भावाच्या जिद्दीची अशीही कहाणी…
भ्रष्टाचारात आकंठ बुडालेल्या युती सरकारच्या नेत्यांचा,’एकत्र टेंडर काढणे आणि कमिशन खाणे’ हा एक कलमी कार्यक्रमच जोमात सुरू आहे. राज्यातील सरकार हे खोकेबाज, धोकेबाज आणि लुटारूंची टोळी असल्याचा सणसणीत आरोप विरोधी पक्ष नेत्यांनी यावेळी केला. यांना दोन वर्षे बहीण आठवली नाही, लोकसभा निवडणुकीत जिरल्यावर आता बहीण लाडकी झाली. स्वतःच्या बहिणीला पाडण्यासाठी बायकोला विरोधात उभे करणाऱ्यांनी योजनेची घोषणा केली, असा घणाघात त्यांनी अजित पवार यांचा नामोल्लेख न करता केला.
आता यांच्या सोबत असलेला तो राणा म्हणतो, मतदान नाही केले तर लाडकी बहीण चे पैसे परत घेऊ. हे पैसे काही कुणाच्या बापाचे नाही, ते करदात्यांचे आहेअसे त्यांनी ठणकावून सांगितले. राज्यातील युती सरकार मधील तिन्ही पक्षात कोण किती ‘खाऊ शकते’ याचे शीतयुद्ध सुरू आहे. यांनी महाराष्ट्र गुजरात कडे गहाण ठेवण्याचे पाप केल्याचे वडेट्टीवार म्हणाले.
आणखी वाचा-उदय सामंत म्हणतात, ‘आपल्या नेत्यांवर टीका खपवून घेऊ नका…’
अनुदान बंद आणि लूट
दरम्यान तिजोरीची उधळपट्टी लावल्याने राज्याची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. १२ ऑगस्ट पासून राज्यातील सर्व कंत्राटदारांनी सरकारी कामे थांबविली आहे, कारण त्यांची देयकेच मिळत नाही. निराधार योजना, कोतवालांचे मानधन अनेक महिन्यापासून मिळाले नाही असा गंभीर आरोप वडेट्टीवार यांनी केला. पैसे नसताना कर्ज काढून ५ लाख कोटींच्या निविदा काढून ‘त्रिकुटाने’ कोट्यवधींची कमाई केल्याचा आरोपही त्यांनी केला.
सौंदर्यीकरण कामावर खरपूस टीका
या दोन्ही नेत्यांनी बुलढाणा शहर व परिसरात सुरू असलेल्या विकास कामे आणि सौंदर्यीकरण कामावर खरपूस टीका केली. या सरकारने तिजोरीची उधळपट्टी चालविली हे या कामावरून सिद्ध होते, असा आरोप थोरात यांनी केला. सौदर्यीकरणच्या नावाखाली बुलढाणा शहरात सुरू असलेली कामे याचे उदाहरण ठरते, असे ते म्हणाले. वडेट्टीवार यांनीही या कामाकडे लक्ष वेधून गंभीर आरोप केले.