बुलढाणा: जिजाऊंचे माहेर असलेल्या सिंदखेडराजा येथून अमरावती विभागातील काँगेसच्या जन संवाद यात्रेचा शुभारंभ झाला. यावेळी अमरावती विभाग यात्रा प्रमुख तथा विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी मराठा आरक्षणावरून सत्ताधाऱ्यांना आडव्या हाताने घेच आरोपांच्या फैरी झाडल्या. ‘नागपूरचे रिमोट’ आरक्षणावरून सर्वांना फिरवीत असल्याचा घणाघात करून तत्कालीन भाजप सरकारने, सुनियोजित डावपेच आखून मराठ्यांना न टिकणारे आरक्षण दिले. आताही सरकार मराठा व कुणबी मध्ये भांडण लावून देण्याचे काम करीत असल्याचा थेट आरोप त्यांनी केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेची सुरुवात मातृतीर्थ सिंदखेड राजा येथून आज बुधवारी( दि ६) राष्ट्रमाता जिजाऊंच्या जन्मस्थळाचे दर्शन घेऊन करण्यात आली. यावेळी उपस्थित नेते, कार्यकर्ते व नागरिकांच्या साक्षीने वट्टेडीवार यांनी आरक्षणावरन सरकारला चांगले धारेवर धरले. मराठा आरक्षण मागच्या सरकारने का दिले नाही अशी ओरड आता सत्ताधारी पक्षातील मंत्री करीत आहेत. सध्याच्या मंत्रिमंडळातील १८ मंत्री हे मागच्या सरकारच्या काळातही मंत्री होते.

हेही वाचा… वाशिम जिल्ह्यातील पीक स्थिती चिंताजनक; शासन दरबारी पाठपुरावा करण्याची वड्डेटीवारांची ग्वाही

मग तेव्हा त्यांनी आरक्षण का दिले नाही असे विचारून तेव्हा हे मंत्री केवळ सत्तेचा मलिदा खात होते काय? असा करडा सवाल त्यांनी केला. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता एका महिन्याच्या आत मराठ्यांना आरक्षण द्यावे, अशी मागणीही वट्टेडीवार यांनी केली. भाजप सरकारने तेंव्हा टिकाऊ आरक्षण न देता समाजाची बोळवण केली. गायकवाड समितीचा अहवाल न्यायालयाने फेटाळला. उच्च न्यायालयात जे वकील होते, त्यांनीच सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडली. भाजप सरकार मराठा आणि ओबीसी मध्ये भांडण लावून देण्याचे काम करत असून ते आपली राजकीय पोळी त्यावर शेकून घेत आहे.

हेही वाचा… धुळ्याजवळील अवैध बायोडिझेल पंपावर विशेष पथकाचा छापा; १५ लाखाचा मुद्देमाल जप्त

मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी सरकारने विशेष अधिवेशन बोलवून व त्यात ठराव घेऊन तो केंद्राकडे पाठवावा. केंद्रात आणि राज्यात भाजपचीच सत्ता आहे. त्यामुळे त्यांना हे करणे कठीण नाही. मात्र मुळात, त्यांची नियत देण्याची नियतच नाही असा आरोप त्यांनी केला.

‘सीएम, डिसीएम’ यांची नार्को टेस्ट’ करा

जालना जिल्ह्यात शांततेने सुरू असलेले उपोषण मोडून काढण्यासाठी अमानुषपणे लाठीमार करण्यात आला. मात्र तो कोणाच्या आदेशाने करण्यात आला व त्याला जबाबदार कोण, असा संतप्त सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. आम्ही आदेश दिला नाही, असे सांगणाऱ्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची ‘नार्को टेस्ट’ करा, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी यात्रेचे जिल्हा समन्वयक प्रदेश उपाध्यक्ष संजय राठोड, सचिव जयश्री शेळके, आमदार राजेश एकडे, ज्येष्ठ नेते लक्ष्मण घुमरे आदी हजर होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Opposition leader vijay wadettiwar slams ruling party over maratha reservation scm 61 dvr 99
Show comments