नागपूर : कोराडीतील प्रस्तावित १,३२० मेगावॅटच्या वीज प्रकल्पाची जनसुनावणी कोराडी प्रकल्प परिसरात सुरू झाली आहे. सुनावणी सुरू होण्यापूर्वी कोराडी नागपूर हवामान संकटाच्या सदस्यांनी मंच परिसरात प्रकल्पाला विरोध केल्याने तणाव निर्माण झाला होता.
महानिर्मितीच्या कोराडी येथे ६६० मेगावॅटचे २ नवीन संच लावण्याचे प्रस्तावित आहे. त्याला प्रदूषणाच्या कारणावरून अनेक संघटनांचा विरोध आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही यासंदर्भात उपमुख्यमंत्री व उर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून हा प्रकल्प कोराडीत न करता पारशिवनीत स्थानांतरित करा, अशी विनंती केली होती. त्यानंतर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले व याच पक्षाचे स्थानिक आमदार विकास ठाकरे यांनीही हा प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली आहे.
स्वंयसेवी संघटना, पर्यावरणवादी संघटनांचा प्रकल्पाला विरोध आहे. या सर्वांच्या विरोधानंतरही ही सुनावणी कोराडी प्रकल्प परिसरात सोमवारी भर दुपारी सुरू झाली. सुनावणी सुरू होण्याच्या काही वेळापूर्वी कोराडी नागपूर हवामान संकटाचे सदस्य प्रकल्पाला विरोध असल्याचे सांगत मंच परिसरात गोळा झाले. त्यांची पोलिसांसोबत शाब्दिक चकमक झाली. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर पोलिसांनी बंदोबस्त वाढवल्याने पर्यावरणवादी शांत झाले. ही घटना घडल्याच्या काही वेळानंतर जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सुनावणी सुरू केली. येथे पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असून सुनावणीसाठी नागरिकांनी गर्दी केली आहे. येथे आमदार विकास ठाकरे यांच्यासह लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने हजर आहे.