केंद्र सरकारची नीती ही कामगारांच्या विरोधात असेल तर सरकारच्या विरोधात जाऊन आंदोलन करू. कामगारांच्या हिताचे निर्णय केंद्र सरकारने घेतले नाही तर त्याचा फटका २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सरकारला बसण्याची शक्यता आहे, असा इशारा भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष हिरणमय पंड्या यांनी दिला आहे.
अखिल भारतीय मजदूर संघाच्या ज्येष्ठ नागरिक परिसंघाच्या बैठकीच्या निमित्त हिरणमय पंड्या नागपुरात आले असता ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. रेल्वे आणि संरक्षण विभागाचे ५० टक्के खाजगीकरण करण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या खासगीकरणाच्या नीतीविरोधात भारतीय मजदूर संघाने यापूर्वी विरोध केला आणि यापुढे करत राहणार आहे. रेल्वेचे जवळपास पन्नास टक्के खासगीकरण झाले आहे. संरक्षण क्षेत्राचेही कॉर्पोरेटायझेशन झाले असून भारतीय मजदूर संघाचा त्याला विरोध आहे, असे पंड्या म्हणाले.