हॅलो ऐवजी वंदे मातरम म्हणण्याला विरोध करण्याचे काहीच कारण नाही. वंदे मातरमला विरोध करणे म्हणजे संविधानाला विरोध करण्यासारखे आहे, असे मत राज्याचे वन व सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले.
मुनगंटीवार नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले, वंदे मातरम म्हणण्याला रझा अकादमीने विरोध केला आहे. मात्र, आम्हाला त्यांचे मत परिवर्तन करायचे आहे. सर्वसामान्य व्यक्तींनी या मोहिमेत भाग घ्यावा व स्वतःला सवय लावावी. कारण हॅलो शब्दाची सवय झाली आहे. प्रयत्नपूर्वक काही शब्द रूढ होतात. वंदे मातरम बाबत राजकारण नको. संविधानाने त्याला राष्ट्रगानचा दर्जा दिलेला आहे. त्यामुळे वंदे मातरमला विरोध करणे म्हणजे संविधानाने दिलेल्या शब्दाला विरोध करण्यासारखे असल्याचे ते म्हणाले.
वंदे मातरमचा अर्थ या भूमीला नमन करणे असा आहे. वंदे मातरम हा राजकीय किंवा जातीय शब्द नाही. यात शिवसेनेचे किंवा कोणत्या पक्षाचे काय मत आहे, हे माझ्या दृष्टीने महत्वाचे नाही. माझ्या दृष्टीने बोलताना वंदे मातरम म्हणण्याची सवय लावण्याचा प्रयत्न करायचे असल्याचे मुनगंटीवार म्हणाले.
वंदे मातरम म्हटले नाही तर तुम्ही आम्हाला जेलमध्ये टाकणार का, असा सवाल राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला. त्यावर बोलताना मुनगंटीवार म्हणाले, हॅलो या शब्दाला पर्यांयी हा शब्द वापरण्याची सवय करावी. आघाडी सरकार असताना शिवसेनेकडे जी खाती होती साधारणतः तेच आता शिंदे गटाच्या सेनेकडे आहे. भाजपने महत्त्वाचे खाते घेतले, असे म्हणणे योग्य नाही. त्यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादीकडे जी खाती होती ती आम्ही घेतलेली आहेत. शिवसेनेने यावर टीका करणे म्हणजे स्वतःचीच निंदा करण्यासारखा प्रकार असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.