लोकसत्ता टीम
अकोला: श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या अकोल्यातील सभेला विरोध करणाऱ्या वंचित बहुजन युवा आघाडीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी शनिवारी नोटीस बजावली आहे. वातावरण बिघडवणाऱ्या संभाजी भिडेंच्या कार्यक्रमाला राज्यात परवानगी देऊ नये, अन्यथा राज्यभरात रस्त्यावर उतरू, असा इशारा वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांनी दिला.
आणखी वाचा-दीक्षाभूमी स्मारक समितीमध्ये वादाची ठिणगी, २७ जागांवर प्राध्यापक भरती अन्…
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान अकोला विभागाच्यावतीने संभाजी भिडे यांचे जाहीर व्याख्यान ३० जुलैला सायंकाळी ५ वाजता ओम मंगल कार्यालय येथे आयोजित केले आहे. तत्पूर्वी, ते पातूर येथे श्री सिदाजी महाराज मंदिराला भेट देणार आहेत. या कार्यक्रमाला विरोध करणाऱ्या वंचितच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे. दरम्यान, संभाजी भिडेंची पाठराखण पोलिसच करीत आहेत, असा आरोप वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांनी केला. गृहविभागाच्या इशाऱ्यावर त्यांना रान मोकळे असून विरोध करणारे वंचितचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना नोटीस पाठवली जाते. वंचित बहुजन युवा आघाडी हे खपवून घेणार नाही. पोलिसांनी कार्यकर्त्यांना लक्ष्य करू नये, अन्यथा राज्यभर युवा आघाडी रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशारा देखील पातोडे यांनी दिला.