चंद्रपूर: विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी स्वत:ची मुलगी तथा प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार यांच्या उमेदवारीसाठी थेट दिल्लीतून मोर्चेबांधणी सुरू केल्यानंतर आमदार प्रतिभा धानोरकर यांनी मुंबई, दिल्ली व स्थानिक अशा तिन्ही आघाड्यांवर प्रयत्न सुरू केले आहेत. शिवानी वडेट्टीवार हिचे नाव समोर येताच इंडिया आघाडीतील घटक पक्षांच्या जिल्हाध्यक्षांनी तीव्र विरोध दर्शवित लोकसभा क्षेत्रातील स्थानिक उमेदवाराचा आग्रह धरला असून तसा ठराव पक्षाकडे पाठविला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पक्षात उमेदवारीवरून वडेट्टीवार व धानोरकर यांच्यात चांगलेच शितयुद्ध सुरू झाले आहे. मुलीच्या उमेदवारीसाठी वडेट्टीवार स्वत: दिल्लीत तळ ठोकून बसले होते. राहुल गांधी यांच्या जाहीर सभेसाठी वडेट्टीवार आजच मुंबईत दाखल झाले आहेत. तर मुलगी शिवानी अजूनही दिल्लीत उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न करीत आहेत. तिकडे धानोरकर यांनी नैसर्गिक न्यायाने लोकसभेचे तिकीट मिळावे म्हणून नेत्यांच्या गाठीभेटी घेणे सुरू केले आहे. महाविकास आघाडी व इंडिया आघाडीतील घटक पक्षांनी स्थानिक उमेदवाराचा आग्रह धरत धानोरकर यांना अप्रत्यक्ष पाठिंबा दर्शविला आहे. देशामध्ये महाविकास आघाडीची सत्ता स्थापन करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर संघटन बांधणी आणि प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील सर्व महाविकास आघाडीच्या जिल्हा पक्षप्रमुखांनी बैठक घेऊन आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून स्थानिक व्यक्तीलाच तिकीट देण्याबाबत ठराव घेतला. हा ठराव केंद्रीय समितीकडे पाठविण्यात येणार आहे.

हेही वाचा – नागपूर : प्रेयसीच्या वडिलाला पाठवली मुलीची अश्लील चित्रफीत

हेही वाचा – जिंकण्याची क्षमता असेल तरच जागा मागा, शहा यांनी शिंदे-पवारांना बजावले !

महाविकास आघाडीमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना, आम आदमी पार्टी, समाजवादी पार्टी आणि संभाजी ब्रिगेड तसेच अन्य पक्ष पदाधिकारी सहभागी आहेत. मागील लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वत्र भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निवडून आले असताना केवळ चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात बाळू धानोरकर यांच्या रुपाने काँग्रेसने विजय मिळवला. परंतु, त्यांचे दु:खद निधन झाले. त्यांनी केलेला संकल्प आणि त्यांचा विकासाचा ध्यास पुढे नेण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु आहेत. या भागामध्ये त्यांच्या प्रती आस्था आहे. आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये स्थानिक व्यक्तीला उमेदवारी दिल्यास महाविकास आघाडीला मोठा लाभ होऊ शकतो, असे या ठरावात म्हटले आहे.

हेही वाचा – ‘मेरे घर के ऊपर से वायर… ‘, ही कसली जनहित याचिका, उच्च न्यायालय म्हणाले…

हेही वाचा – राज्यात पुन्हा १० हजार शिक्षकांची भरती, कोणत्या महिन्यात होणार टीईटी? जाणून घ्या…

या बैठकीला शहर (जिल्हा) काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी, ग्रामीण जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दीपक जयस्वाल, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गटा) चे जिल्हाध्यक्ष संदीप गिऱ्हे, आम आदमी पार्टीचे वरिष्ठ नेता सुनील मुसळे, आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार, समाजवादी पार्टीचे अध्यक्ष सोयल शेख, संभाजी बिग्रेडचे शहर अध्यक्ष विनोद थेरे उपस्थित होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Opposition to vijay wadettiwar so support to pratibha dhanorkar read what is happening in chandrapur rsj 74 ssb