संजय बापट, लोकसत्ता

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर : राज्यातील शेतकरी दुष्काळ, अवकाळी, गारपीट, मिचाँग वादळामुळे उद्धवस्त झाला असून सरकारच्या मदतीकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे सभागृहात तातडीने चर्चा करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी करीत विरोधकांनी शुक्रवारी विधानसभेचे कामकाज रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्थगन फेटाळल्यामुळे नाराज झालेल्या विरोधकांनी कामकाजावर बहिष्कार टाकत संताप व्यक्त केला. तर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सभागृहात चर्चा करून सर्व सहमतीने मार्ग काढण्याची तयारी असून कांदा निर्यातबंदी आणि उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मितीवरील बंदीचा फेरविचार करण्याची विनंती केंद्राला करण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून  विरोधकांनी सलग दुसऱ्या दिवशी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. विधानसभेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, नाना पटोले, जयंत पाटील आदींनी स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून प्रश्नोत्तराचा तास स्थगित करून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्याची मागणी केली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री काल शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आलेत. शेतकऱ्यांची परिस्थिती त्यांच्या लक्षात आली असेल. राज्यात अवकाळीमुळे पिके वाया गेलीत. निर्यात बंदीमुळे आता कांदा उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. सरकारने एक रुपयात पीक विमा उतरवला पण यात पीकविमा कंपन्यांना कोटय़वधींचा फायदा होत आहे. विम्याच्या हप्तय़ापोटी कंपन्यांना आठ हजार रुपये मिळाले असून शेतकऱ्यांना जेमतेम दोन हजार कोटींची नुकसानभरपाई मिळाली आहे. त्यामुळे विमा कंपन्यांना सहा हजार कोंटीचा फायदा झाला असून सरकार ही योजना कोणासाठी राबवत आहे अशी विचारणा वडेट्टीवार यांनी केली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा व्हावी. अशी मागणी वडेट्टीवार आणि नाना पटोले यांनी केली.

हेही वाचा >>> आता पटेलप्रकरणी भाजप लक्ष्य; इक्बाल मिर्चीशी संबंधांवरून मविआ आक्रमक

‘शेतकरी, मराठा आरक्षणावरून सरकारला घेरणार’

नागपूर : अवकाळी पावसामुळे झालेले शेतकऱ्यांचे नुकसान आणि मराठा आरक्षण या मुद्दय़ांवर सरकारला घेरण्याची योजना महाविकास विकास आघाडीने आखली आहे. शुक्रवारी नागपुरात झालेल्या आघाडीच्या बैठकीनंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेण्यात आली. पुढील आठवडय़ात याच मुद्दय़ांवर चर्चा करण्याची विनंती करण्यात आली.

काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांची आज विधान भवन परिसरातील दालनात बैठक झाली. या वेळी सरकारला हिवाळी अधिवेशनात शेतकरी आणि मराठा आरक्षणांवरून घेरण्याचे डावपेच आखण्यात आले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Opposition tried to block the proceedings of maharashtra legislative assembly over farmers issue zws