नागपूर: ‘धारावी बचाव, अदाणी हटाव’ अशा घोषणा देत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बुधवारी निदर्शने केली. आमदारांनी विधिमंडळ परिसरात मोर्चा काढून आंदोलन केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विधानभवन परिसरात पायऱ्यांवर ‘पन्नास खोके, एकदम ओके’, ‘ खोके सरकारचे करायचे काय, खाली डोके वरती पाय’, ‘ अदानीला सूट, धारावीची लूट, ‘ धारावी वाचवा, लघुउद्योग वाचवा’, ‘ अदानीला सुटली धारावीची हाव’ अशाही घोषणा देण्यात आल्या. दानवे यांच्याशिवाय, वर्षा गायकवाड, वैभव नाईक, रवींद्र वायकर व इतर आमदार या आंदोलनात सहभागी होते.

हेही वाचा… अनुसूचित जातीच्या आरक्षणात विभागणी होणार? उपवर्गीकरण करण्यासंदर्भात अभ्यास समिती

अंबादास दानवे यावेळी म्हणाले की, धारावीची मालकी अदाणींच्या घशात घालण्याचा सरकारचा डाव आहे. धारावीत प्रत्येक घरी लघुउद्योग चालतो. या परिसराचे पुनर्वसन झाल्यास लघुउद्योगांचेही मोठे नुकसान होणार आहे. टीडीआरची मालकी अदानींना देऊन खोके सरकार अदानीची दलाली करते आहे, अशी टीका दानवे यांनी केली.

वर्षा गायकवाड यांनी धारावीमध्ये टीडीआरचा मोठा घोटाळा झाला असल्याचा आरोप केला. निविदांचे निकष तसेच इतर नियम बदलण्यात आले. धारावीतील जागा रिकामी करण्यासाठी माजी पोलिस आयुक्तांकडून दबाव आणला जातो आहे. याशिवाय, गुंडांचेही साहाय्य घेतले जाते आहे. अदानींच्या फायद्यासाठी हा सगळा प्रकार होत असल्याचे वर्षा गायकवाड म्हणाल्या.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Oppositions in the legislative council staged a protest on the steps of the legislature on wednesday raising slogans like dharavi bachao adani hatav nagpur mnb 82 dvr