नागपूर : शनिवारी वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाने उपराजधानीला झोडपले. रविवारी पुन्हा हवामान खात्याने उपराजधानीसह विदर्भाला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
विदर्भ, मराठवाड्यासह राज्याच्या विविध भागात पावसाला पोषक हवामान आहे. आज पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस, गारपिटीचा इशारा (ऑरेंज अलर्ट) हवामान खात्याने दिला आहे. उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह उन्हाचा चटका कायम राहणार आहे. पश्चिम बंगालपासून आंध्र प्रदेशापर्यंत तसेच, मराठवाड्यापासून कर्नाटक, तामिळनाडू ते कोमोरिन भागापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. ही स्थिती पूरक ठरल्याने राज्यात पावसासाठी पोषक हवामान तयार झाले आहे. आज रविवारी पूर्व विदर्भात वादळी वाऱ्यासह पाऊस, गारपिटीची शक्यता आहे. उपराजधानीत शनिवारी वादळीवाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेक झाडे कोसळली. मोतीबाग रेल्वे वसाहतीत एका घराचे छत पूर्णपणे उडाले. अवघ्या अर्धा तासाच्या गारामिश्रीत पावसाने संपूर्ण शहराला झोडपून काढले. दरम्यान, हवामान खात्याने जिल्ह्याकरिता १७ ते १९ मार्चपर्यंत ‘ऑरेंज अलर्ट’ दिला आहे.
हेही वाचा…नागपूर- रामटेक लोकसभा मतदारसंघात ४२ लाखावर मतदार, साडेचार हजार मतदानकेंद्र
शनिवारी सकाळपासूनच ऊन आणि आभाळ असे वातावरण होते. दुपारी तीनच्या सुमारास आकाश काळवंडले आणि विजा चमकू लागल्या. त्याचवेळी वादळीवाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने संपूर्ण शहराला झोडपले. महाल येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक, चांभार नाला अशोक चौक येथे वाहनावर झाडे कोसळली. उपराजधानीतील अनेक भागात वादळीवाऱ्यासह आलेल्या पावसाच्या तडाख्यात कुठे वीज यंत्रणेवर झाडे पडली तर कुठे तांत्रिक बिघाडामुळे तासंतास वीज पुरवठा खंडित झाला. वीज पुरवठा खंडित झालेल्या भागामध्ये काटोल रोड, अंबाझरी, सिव्हिल लाईन्स, मेकोसाबाग, दहीबाजार बस्तरवाडी, गोधनी, कलेक्टर कॉलनी, ओंकारनगर, नरेंद्रनगर, दवा बाजार, राजाबाक्षा, विश्वकर्मानगर, फेट्री, बोरगावसह इतरही अनेक भागांचा समावेश होता. या भागात पन्नास हजारांवर वीज ग्राहक आहेत. या भागातील काही भागात वीज यंत्रणेवर झाड कोसळले.
काही भागात तांत्रिक बिघाडामुळे पुरवठा खंडित झाला. महावितरण कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठत दुरूस्तीचे काम हाती घेतले. वैयक्तिक तत्कारींवर रात्री उशिरापर्यंत काम सुरू होते. ग्राहकांनी मात्र तासंतास वीज पुरवठा खंडित राहिल्याचा आरोप केला. परीक्षेचा काळ असताना वीज पुरवठा खंडित झाल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासात अडचणी आल्याची माहिती पालकांनी दिली.