नागपूर : महाराष्ट्राच्या हवामानात सातत्याने बदल होत असून भारतीय हवामान खात्याने आज काही जिल्ह्यांना पावसाचा “ऑरेंज अलर्ट” दिला आहे. राज्याच्या अनेक भागात वादळी वारे आणि गारपीटीसह हलक्या ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांसाठी “ऑरेंज अलर्ट” देण्यात आला आहे तर कोकणात हलक्या पावसाचा अंदाज आहे.

दरम्यान, राज्यातील अनेक भागात कमाल तापमानात चार ते पाच अंश सेल्सिअसने घट झाली आहे. विदर्भातील तापमानाचा पारा चांगलाच चढला होता. गेले काही दिवस अनेक शहरांमधील तापमान ४२ अंश सेल्सिअसपलीकडे गेले होते. तर अनेक शहरांमध्ये तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक होता. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून विदर्भासह राज्यातील सर्वच ठिकाणचे हवामानाचे चित्र पालटले आहे.

मंगळवारी मध्यरात्री नागपूर येथे वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळला. पावसापेक्षाही वादळीवाऱ्याचा जोर अधिक होता. तर बुधवारी सायंकाळी देखील वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळला. वर्धा जिल्ह्यात देखील वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. तर आजदेखील दुपारनंतर गारपीट आणि वादळी वाऱ्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. नागपुरात हवामान तीव्र राहील, जिथे कमाल तापमान ३९ अंश सेल्सिअस आणि किमान २३ अंश सेल्सिअस नोंदवले जाईल. तर अकोला, अमरावती आणि चंद्रपूर जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. दरम्यान, प्रादेशिक हवामान खात्याने आक नागपूरसह बुलडाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. यावेळी साधारणपणे ५० ते ६० किलोमीटर प्रतितास या वेगाने वारे वाहतील. नागपुरात पहाटेपासूनच रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. तर भंडारा येथे सकाळी साडेसात वाजेपासून वादळी वारा व विजांच्या कडकडाटात पावसाची सुरुवात झाली आहे.

राज्याच्या इतर भागात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सातारा आणि जालना यांसारख्या भागांत जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर बीड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. बीड जिल्ह्याला आज “येलो अलर्ट” देण्यात आला आहे. या कालावधीत विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता असून नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे.