अमरावती : विदर्भातील प्रमुख फळपीक म्‍हणून ओळखल्‍या जाणाऱ्या वरूड आणि मोर्शी तालुक्यातील संत्र्याची परिस्थिती  गंभीर झाली असून रोगराई, अल्‍पभाव, प्रक्रिया उद्योगांचा अभाव यामुळे संत्री उत्‍पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. सरकारच्‍या चुकीच्‍या धोरणामुळे ही परिस्थिती उद्भवल्‍याचे शेतकऱ्यांचे म्‍हणणे आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मोर्शी आणि वरूड तालुक्यात सुमारे ५ हजार हेक्टरवर संत्री उत्पादन घेतले जाते. परंतु एकूण उत्पादनाच्या ४० टक्के संत्री आकाराने लहान असल्याने त्याला योग्य भाव मिळत नाही. परिणामी तो एकतर मातीमोल भावाने विकावा लागतो किंवा फेकून देण्याशिवाय पर्याय राहत नाही. प्रत्यक्षात असा संत्रा प्रक्रियेच्या दृष्टीने उपयुक्त ठरणारा आहे. दुर्दैवाने विदर्भात एकही संत्रा प्रक्रिया उद्योग नसल्याने संत्री उत्पादक दरवर्षी त्याच त्याच समस्यांना तोंड देत आहेत. आंबिया व मृग बहाराला अत्यल्प भाव मिळत असल्यामुळे संत्री उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे  मार्च महिना येऊन सुद्धा संत्री झाडावरच आहेत. डिंक्या, कोळशीचा प्रादुर्भाव, तंत्रज्ञानाचा नैसर्गिक आपत्तीचा विळखा, सिंचनाचे नगण्य प्रमाण, प्रक्रिया उद्योगांचा अभाव, निर्यातशून्य धोरण, सदोष फळपीक विमा अशी असंख्य कारणे यासाठी जबाबदार मानली जात आहेत.

हेही वाचा >>> “…तर अकोला लोकसभा लढवणार”, अमोल मिटकरींचं मोठं विधान

कोळशीच्या प्रादुर्भावामुळे वर्षानुवर्षे जोपासलेल्या संत्र्याच्या बागाही पुढील वर्षांसाठी संकटात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दिवसेंदिवस कोळशी या काळ्या माशीपासून होणाऱ्या रोगाचा प्रादुर्भाव वाढतच चालल्याचे चित्र दिसत आहे. दरवर्षी पावसाळ्यात अल्प प्रमाणात होणाऱ्या कोळशीचा प्रादुर्भाव यंदा एवढा जास्त होता की, वर्षानुवर्षे जोपासलेल्या संत्र्याच्या बागाही पुढील वर्षांसाठी संकटात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे संत्रा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहे.  संत्र्याच्या बागा कोळशीच्या प्रादुर्भावात अडकल्या असून संत्र्याची हजारो झाडे फळासह काळी पडली.

  ‘नागपुरी संत्रा’ म्हणून प्रसिद्ध असलेला संत्रा मोर्शी आणि वरुड या पट्टयात होतो. हा परिसर संत्र्यांच्या उत्पादनात अव्वल आहे. त्यामुळे या परिसराचा गुणगौरव ‘कॅलिफोर्निया’ म्हणून खूपदा केला जातो. परंतु नेते फक्त गुणगौरव करण्यासाठी तोंड उघडतात. संत्री उत्पादकांना न्याय मिळवून देण्याची वेळ येते, तेव्हा त्यांच्या तोंडाला कुलूप लागते. फक्त घोषणाबाजी करण्यात ते वस्ताद असतात.

-रुपेश वाळके, संत्रा उत्पादक शेतकरी, मोर्शी.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Orange farmers in trouble due to diseases shortages lack of processing industries mma 73 zws