नागपूर : मिहानमधील पतंजली फूड व हर्बल पार्कमध्ये संत्री रस काढण्यास सुरुवात झाली असून पुढील सहा महिन्यात ‘टेट्रा पॅक युनिट’ सुरू करण्यात येणार आहे.टेट्रा पाक पॅकिंग युनिट हे एक मशीन आहे जे ऍसेप्टिक कार्टनमध्ये द्रव अन्न उत्पादने पॅकेज करते. आतापर्यंत एक हजार टन संत्र्यावर प्रक्रिया करण्यात आली आहे. तसेच १०० टन गव्हाचे पीठ तयार करण्यात आले. याशिवाय टोमॅटो, आंबा, पेरू, मिर्ची, गाजरचा रस आणि पेस्ट काढण्यात येणार आहे. मागणीनुसार निर्यात करण्यात येईल, असे पतंजली फूड व हर्बल पार्कच्या व्यवस्थापकांनी सांगितले.

मिहान येथील ‘पतंजली फूड व हर्बल पार्क’ प्लांटची आज पाहणी व आढावा बैठक घेण्यात आली. बहुतप्रतिक्षित पतंजली फूड व हर्बल पार्कचे औपचारिक उदघाटन येत्या ९ मार्चला होत आहे. संत्रा, मोसंबी, कोरफड, कडुलिंब, लिंबू, आवळा आणि इतर औषधी वनस्पतीसह इतर कच्चामाल पतंजली प्रकल्प येथील शेतकऱ्यांकडून विकत घेणार आहे. या प्रकल्पातून प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे विदर्भातील ५० हजारपेक्षा जास्त युवकांना रोजगार मिळणे अपेक्षित आहे. कच्च्या व तयार झालेल्या मालाची वाहतूक, पॅकेजिंग प्रक्रिया यातून मोठी रोजगार निर्मिती होणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १० सप्टेंबर २०१६ मध्ये पतंजली फूड प्रोसेसिंग प्रकल्पाचे भूमिपूजन केले होते. मिहानमध्ये या समूहाला २६५ एकर जमीन अल्पदरात देण्यात आली आहे. या प्रकल्पातून शेतकऱ्यांच्या मालास भाव मिळेल आणि युवकांना रोजगार मिळेल अशी अपेक्षा आहे. प्रकल्पाचे भूमिपूजन होऊन आठ वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. परंतु उत्पादनास सुरुवात झाली नव्हती. त्यामुळे शेतकरी आणि युवकांची घोर निराशा झाली. आता अखेर प्रकल्पातून उत्पादनास पुढील महिन्यात सुरुवात होईल, असे सांगण्यात येत आहे.

या प्रकल्पात कंपनी सुमारे १,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. दररोज ८०० ते ९०० टन संत्र्यांची आवक या प्रकल्पात होणार आहे.पतंजली फूड व हर्बल पार्क मिहान येथे सुरू होणे हा विदर्भातील शेतकऱ्यांसाठी सुवर्णक्षण आहे. या प्रकल्पामुळे विदर्भातील शेतकऱ्यांच्या संत्रा, मोसंबी व कृषी आधारित उत्पादनांना चालना मिळणार आहे. या कृषी उद्योग प्रकल्पामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन होईल कारण विदर्भातील शेतकऱ्यांचा माल या प्रकल्पासाठी घेण्यात येणार आहे.

Story img Loader