बुलढाणा: ‘ऑरेंज बेल्ट’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथे आज संत्रा प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित झाला आहे. रणरणत्या उन्हात पार पडलेल्या या कार्यक्रमात सर्वपक्षीय ‘आंबट गोड’ राजकीय जुगलबंदी रंगली. यामुळे औपचारिक कार्यक्रमाची रंगत वाढलीच पण उपस्थित शेकडो शेतकऱ्यांचे मनोरंजन देखील झाले.अभिता ऍग्रो इंडस्ट्रीज च्या संत्रा प्रक्रिया प्रकल्प अजपासून कार्यान्वित झाला. यावेळी शाहू परिवाराचे संस्थापक भाऊसाहेब शेळके, सीईओ सुनील शेळके, काँगेसचे जयश्री शेळके , ज्योती ढोकणे, प्रकाश पाटील,भीमराव पाटील, भाजपचे प्रमोद खोद्रे, शिवसेना उबाठा चे दत्ता पाटील, गजानन वाघ, राष्ट्रवादीचे राजू भोंगळ, सुनील कोल्हे आदी सर्वपक्षीय राजकारणी हजर होते. मात्र कार्यक्रम कोणताही असो नेते राजकीय विधाने करतातच याचा प्रत्यय या सोहळ्यातही आला. व्यासपीठावर संत्र्यांच्या पॅकिंग साठी आणलेले खोके ठेवण्यात आले होते. भाषणाच्या सुरुवातीलाच त्याकडे कटाक्ष टाकून ज्योती ढोकणे म्हणाल्या की, ‘खोक्यांना पाहून मनस्वी आनंद झाला.
काही नेत्यांना खोके मिळाले पण शेतकऱ्यांना ज्यादिवशी मिळतील तो दिवस भाग्याचा ठरेल. जयश्री ताईंचे कर्तृत्व लक्षात घेता, त्यांना जिल्ह्याचे नेतृत्व करण्याची संधी मिळायला हवी. संगीत भोंगळ म्हणाले की, राजकारणी म्हणून आपण सर्वच कमी पडलो. कारण जे आपण करायला पाहिजे होते, ते शेळके कुटुंबाने केले आहे. जयश्री शेळके यांनी थेट केंद्र सरकारवर निशाणा साधला.’शायनिंग इंडिया’ ने काय केले यापेक्षा मातीतल्या माणसासाठी !काय केले हे महत्त्वाचे आहे. समारोपात बोलताना सुनील शेळके यांनी उपस्थित राजकारण्यांची चांगलीच फिरकी घेतली. ते म्हणाले की, आपण वेगवेगळ्या पक्षांचे नेते आहात. पण उद्योजक म्हणून मला सर्वच पक्षांच्या मदतीची गरज आहे. विविध पक्षाकडून कसे काम करून घ्यायचे हे मला चांगल्या तऱ्हेने माहित असल्याचा मिश्किल टोला त्यांनी लगावला.