भंडारा : सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे भंडारा उपविभागात होणाऱ्या अनेक शासकीय कामांमध्ये अनियमितता आणि भ्रष्टाचार होत असल्याची तक्रार थेट राज्याचे मुख्य सचिव यांचेकडे करण्यात आली. उपविभागीय अभियंता आणि कार्यकारी अभियंता यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित करीत विशेष कार्यकारी अधिकारी विजय क्षीरसागर यांनी ही तक्रार केली.
अखेर ‘त्या’ अभियंत्याच्या चौकशीचे आदेश धडकले असून विशेषतः महिला रुग्णालयाच्या कामाबाबत १२ मुद्द्यांवर अहवाल व दस्तऐवज सादर करण्याचे आदेश नागपूर दक्षता व गुण नियंत्रण मंडळच्या अधीक्षक अभियंता सुषमा बोंद्रे यांनी दिले आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे नुकत्याच झालेल्या डीपीडीसीच्या बैठकीत आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी महिला रुग्णालयाचे नियमबाह्य हस्तांतरण झाल्याचा मुद्दा उपस्थित करून पालकमंत्री सावकारे यांचे याकडे लक्ष वेधले होते.
विशेष कार्यकारी अधिकारी विजय क्षीरसागर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच राज्याचे मुख्य सचिव यांच्याकडे बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता संतोष खोब्रागडे यांच्या विरोधात तक्रार केली आहे. या तक्रारीत त्यांनी नमूद केले आहे की, दोन वर्षांपूर्वी खोब्रागडे हे सार्वजनिक बांधकाम विभागात भंडारा उपविभागीय अभियंता म्हणून रुजू झाले. रुजू झाले तेव्हापासून उपविभागीय अभियंता खोब्रागडे हे तानाशाही पध्दतीने वागत असतात. सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत अनेक शासकीय इमारतीचे बांधकाम सुरू आहे. जुन्या इमारतीकडे त्यांचे दुर्लक्ष करून नवीन कामाना सुरवात केली जाते. विशेष म्हणजे यातील अनेक कामे निकृष्ट दर्जाची असल्याचा आरोप क्षीरसागर यांनी केला आहे.
पत्रकारांचा माहिती मागितल्यावर उर्मट भाषेत आणि उडवाउडवीची उत्तरे देत असून पत्रकारांना असभ्य वागणूक देतात. अशाच एका प्रकरणात खोब्रागडे यांच्या विरोधात २१ जानेवारी रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे त्यांची तक्रार करण्यात आली आहे. या दोन्ही अधिकाऱ्यांच्या अनेक तक्रारी तत्कालीन पालकमंत्री गावीत, मुख्य अभियंता नागपूर व जिल्हाधिकारी भंडारा यांचेकडे झालेल्या आहेत. मात्र त्यांच्यावर राजकीय वरदहस्त असल्याने आजवर त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. मागील वर्षी नागपूर हिवाळी अधिवेशनात देखील उपविभागिय अधिकारी यांची तक्रार केली होती. परंतु वर्ष लोटूनही शासन स्तरावरून त्यांचेवर कुठलीच कार्यवाही झालेली नाही असा आरोप क्षीरसागर यांनी केला आहे. उपविभागीय अभियंता आणि कार्यकारी अभियंता यांची तडकाफडकी बदली करून कार्यालयीन चौकशी करण्यात यावी अशी मागणी विजय क्षीरसागर यांनी केली आहे.
या तक्रारीच्या अनुषंगाने दि. ४ फेब्रुवारी २०२५ रोजी सहाय्यक मुख्य अभियंता सुनील बावणे यांनी अधीक्षक अभियंता, दक्षता व गुण नियंत्रण मंडळ, नागपूर यांना भंडारा सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता यांच्या कामाची चौकशी करणेबाबत पत्र पाठवले. त्यानंतर दि. ११ मार्च २०२५ रोजी दक्षता व गुण नियंत्रण मंडळ, (सा.बां.) नागपूरच्या अधीक्षक अभियंता सुषमा बोंद्रे यांनी क्षीरसागर यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने भंडारा उपविभागिय अभियंता यांच्या चौकशीचे आदेश आणि भंडारा महिला रुग्णालयाच्या कामाबाबत अहवाल व दस्ताऐवजांच्या साक्षांकित प्रती सादर करण्याचे आदेश दिले आहेत. यात प्रशासकीय मान्यता आदेश प्रत आणि तांत्रिक मान्यता प्राप्त अंदाजपत्रकाची प्रत, करारनामा प्रत, काम पूर्ण झाले असल्यास पुर्णत्वाचे प्रमाणपत्र, हस्तांतरण पत्र अशा १२ प्रत मागविण्यात आलेल्या आहेत.
याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता पराग ठमके यांना विचारणा करण्यासाठी संपर्क साधला असता मला अशी कोणतीही आदेशाची प्रत मिळालेली नाही, बोंद्रे मॅडम तुम्हाला कधीपासून परस्पर प्रतिलिपी पाठवायला लागल्या ? असे उर्मट भाषेत उत्तर देत तुम्ही मला चौकशी करणाऱ्या कोण ? असे उत्तर दिले. उपविभागीय अभियंता खोब्रागडे यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी वारंवार संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.
महिला रुग्णालय काम सन २०१३ मध्ये आघाडी शासनाच्या काळात आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या प्रयत्नांनी जिल्ह्यासाठी स्वतंत्र महिला रुग्णालय मंजूर झाले. पहिल्या टप्प्यात त्याची किंमत ४३.८४ कोटी तर दुसऱ्या टप्प्यात २० कोटी ८३ लाख १६ हजार ४२० एवढा निधी या महिला रुग्णालयासाठी मंजुरी झाला. मात्र १२ वर्ष लोटूनही अद्याप या रुग्णालयाचे काम पूर्ण झालेले नाही. असे असताना वैद्यकीय महाविद्यालयासाठी या रुग्णालयाचा पहिला टप्पा हस्तांतरित करण्यात आला. त्याचे रीतसर उद्घाटनही झाले. विशेष म्हणजे महिला रुग्णालयासाठी सामान्य रुग्णालयासमोरील जी जागा निर्धारित करण्यात आली.ती पुराच्या वेळी पाण्याखाली जाते.
मधल्या काळात या महिला रुग्णालयासाठी आमदार नरेंद्र भोंडेकर आणि आमदार परिणय फुके यांच्यात श्रेयवादाची लढाई सुरू झाली. भोंडेकर यांनी तीन वेळा तर फुके यांनी एकदा या रुग्णालयाचे भूमिपूजन केले. अनेक दिव्य पार केल्यानंतरही या रुग्णालयाची साडेसाती संपण्याचे नाव घेत नाही. अखेर आता हे काम चौकशीच्या भोवऱ्यात सापडले आहे.