नागपूरः १९ ऑक्टोबर २०२३ रोजी मोटार वाहन निरीक्षक आणि सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकांच्या बदल्या ऑनलाईन सुरू झाल्या. यावेळी ४८० च्या जवळपास बदल्या झाल्याचा दावा करण्यात आला. परंतु, आदेश निघालेच नव्हते. ‘लोकसत्ता’ने याबाबत वृत्त प्रकाशित केल्यानंतर ३ नोव्हेंबरला काही अधिकाऱ्यांचे बदली आदेश काढण्यात आले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १९ ऑक्टोबरला याबाबतचे संकेत दिले होते. त्यानुसार, ३ नोव्हेंबरला एकाचवेळी राज्यातील १६६ मोटार वाहन निरीक्षक आणि ३१४ सहायक मोटार वाहन निरीक्षकांच्या बदलीचे आदेश निघणे अपेक्षित होते. परंतु केवळ ३० आदेश निघाल्याची सूत्रांची माहिती आहे. दरम्यान, तांत्रिक अडचण आल्याचे सांगत लवकरच सगळेच आदेश अपलोड होणार अशी माहिती परिवहन खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिली. परंतु, शेवटच्या क्षणी बदली आदेशात काही बदल होण्याची शक्यता नकारता येत नसल्याची चर्चा आहे. परिवहन खात्यातील एका अधिकाऱ्याने नाव न टाकण्याच्या अटीवर बऱ्याच अधिकाऱ्यांचे बदली आदेश निघाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला.
हेही वाचा – यवतमाळचे पालकमंत्री हरवले! शेतकऱ्यांची पोलिसांत तक्रार
हेही वाचा – गुजरात-महाराष्ट्रात क्रिकेट सट्टेबाजीसाठी ‘अॅप’चा सर्वाधिक वापर
देवाण-घेवाणीचे आरोप
परिवहन विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी मोठी देवाण-घेवाणीचे आरोप झाले होते. हा प्रकार थांबवण्यासाठी परिवहन खात्याने नवीन संगणकीय प्रणाली विकसित केली. १९ ऑक्टोबर २०२३ रोजी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्र्यांनी १६६ मोटार वाहन निरीक्षक आणि ३१४ सहायक मोटार वाहन निरीक्षकांच्या बदलीची अंतिम यादी काढल्याचा दावा केला गेला. परंतु आदेश निघालेच नव्हते.