नागपूर : केंद्र व राज्य शासन सातत्याने नागरिकांना अवयवदानासाठी प्रवृत्त करण्यासाठी जनजागृती करते. परंतु अद्यापही गरजेच्या तुलनेत मेंदूमृत रुग्णाकडून अवयवदान होत नाही. तरीही नागपुरात यावर्षी १८ मेंदूमृत रुग्णाकडून अवयवदान झाल्याने ही संख्या नवीन विक्रमाच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्यामुळे नागपूर विभागात अवयव प्रत्यारोपणाला बळ मिळत असल्याचे चित्र आहे.
हेही वाचा >>> लोकजागर- निवडणूक आख्यान – एक
एका मेंदूमृत रुग्णाच्या अवयवदानातून मृत्यूच्या दारात उभ्या असलेल्या अनेक रुग्णांना जीवदान मिळू शकते. नागपूर जिल्ह्यात २०१३ पासून अवयवदानाला सुरुवात झाली. ८ मे २०२४ रोजी नागपूर विभागात १४८ मेंदूमृत रुग्णाकडून अवयवदान झाले. त्यातून अनेकांना जीवदान मिळाले. २०२३ मध्ये सर्वाधिक ३५ मेंदूमृत रुग्णांकडून अवयवदान झाले. १ जानेवारी २०२४ पासून ८ मे २०२४ पर्यंत नागपूर विभागात एकूण १८ मेंदूमृत रुग्णांकडून अवयवदान झाले. केवळ साडेचार महिन्यात १८ मेंदूमृत रुग्णांकडून अवयवदान झाले. ही संख्या यंदा नवीन विक्रम नोंदवेल, असा विश्वास विभागीय अवयव प्रत्यारोपण समितीने व्यक्त केला आहे.
शेतमजुराकडून अवयवदान..
वर्धा जिल्ह्यातील सुखदेव बोबडे (४४) या शेतमजुराचा दुचाकीने अपघात झाला. उपचारासाठी त्यांना वर्धेतील आचार्य विनोबा भावे रुग्णालयात दाखल केले गेले. उपचाराला प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांचा मेंदूमृत झाल्याचे पुढे आले. नातेवाईकांचे समुपदेशन केल्यावर त्यांनी अवयवदानाला परवानगी दिली. त्यानंतर रुग्णाचे दोन मूत्रपिंड व एक यकृत दुसऱ्या रुग्णात प्रत्यारोपित केले गेले.