सुरुवातीला करोना व त्यानंतर विविध कारणाने मूत्रपिंड उपलब्ध न झाल्याने वणीतील शिक्षकाची प्रकृती खालावून मेंदूमृत झाला. कुटुंबीयांनी रुग्णाच्या इच्छेनुसार अवयवदानाचा निर्णय घेतला. त्यामुळे अवयवाच्या प्रतीक्षेतील शिक्षकाने जगाचा निरोप घेण्यापूर्वी यकृतातून एकाचा जीव वाचवला, तर दोघांना नवीन दृष्टी मिळणार आहे.
हेही वाचा >>>नागपूर : मिहानमधील कंपन्या अधिकाऱ्यांवर नाराज
दिलीप पांडुरंग गोहोकर (४९) रा. वणी, यवतमाळ असे मेंदूमृत रुग्णाचे नाव आहे. ते वणीतील शाळेत भौतिकशास्त्राचे शिक्षक होते. २०२१ मध्ये त्यांचे मूत्रपिंड निकामी झाले.तेव्हापासून ते ‘डायलेसिस’वर होते. त्यांनी २०२२ मध्ये मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी विभागीय अवयव प्रत्यारोपण समितीकडे नोंदणीही केली होती.दरम्यान, १२ जानेवारीला त्यांना एस.एस. मल्टिकेअर हाॅस्पिटलमध्ये दाखल केले गेले. यांचा मेंदूमृत झाल्याचे पुढे आले. ही माहिती विभागीय अवयव प्रत्यारोपण समितीला देण्यात आली. समितीचे अध्यक्ष डॉ. संजय कोलते, सचिव डॉ. राहुल सक्सेना, डॉ. मनीष बलवानी, दिनेश मंडपे यांनी नातेवाईकांशी संपर्क साधला. रुग्णाची पत्नी शिल्पा आणि मुलगी वैष्णवी यांनी क्षणाचाही विलंब न करता अवयव प्रत्यारोपणाला होकार दर्शवला. त्यानुसार रुग्णाच्या अवयवांशी समरूप असलेल्या प्रतीक्षेतील रुग्णाचा शोध सुरू झाला.
हेही वाचा >>>नागपूर: दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांची यंदा कसोटी, दोन वर्षांनंतर १०० टक्के अभ्यासक्रम
यावेळी एक यकृताच्या प्रतीक्षेतील रुग्ण एलेक्सिस रुग्णालयात असल्याचे पुढे आले. परंतु, फुफ्फुसाशी समरूप रुग्ण मिळाला नाही. त्यामुळे तातडीने अवयव ग्रीन कॅरिडोरच्या मदतीने संबंधित रुग्णालयात पाठवून तेथील रुग्णात प्रत्यारोपित करण्यात आले. तर नेत्र माधव नेत्रपेढीला दिले गेले. हे डोळे दोन रुग्णात प्रत्यारोपित होणार असल्याने त्यांनाही नवीन दृष्टी मिळणार आहे.