स्पेनच्या तुलनेत भारतात अत्यल्प अवयवदान होतात. त्यामुळे अनेकांना प्राण गमवावे लागतात, अशी माहिती सुप्रसिद्ध यकृत प्रत्यारोपण तज्ज्ञ प्रा. डॉ. टॉम चेरियन यांनी दिली. अवयवदान दिनाच्या पूर्वसंध्येला व्होकार्ट रुग्णालयात अवयवदानाशी संबंधित उडान हा कार्यक्रम झाला. त्यात अवयवदान करणाऱ्या दानदात्यांसह समाज कार्यातील नागरिकांचा सम्मान करण्यात आला. यावेळी डॉ. चेरियन पुढे म्हणाले, स्पेनमध्ये प्रति दहा लाखांमध्ये ३३ ते ३५ जणांकडून अवयवदान केले जाते.
हेही वाचा >>> गर्भवती मातांचा असाही एक ‘रॅम्प वॉक शो’!
भारतात प्रति दहा लाखांमध्ये केवळ ०.३ नागरिकच अवयवदान करतात. योग्य जनजागृती करून देशात दहा लाखात ३ जणांनीही अवयवदान केल्यास अनेकांचे जीव वाचणे शक्य असल्याचे त्यांनी सांगितले. मूत्रपिंड प्रत्यारोपणाने आयुष्य वाढते मूत्रपिंड प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. सूर्यश्री पांडे म्हणाल्या, मूत्रपिंड प्रत्यारोपणानंतर ९७ टक्के रुग्ण एक वर्षाहून अधिक तर ८७ टक्के रुग्ण हे पाच वर्षांहून अधिक जगतात. प्रत्यारोपणाच्या वेळी विशेष काळजी, योग्य औषध, योग्य आहाराकडे लक्ष देण्याची गरज आहे. आवश्यक काळजी घेतल्यास प्रत्यारोपण केलेला रुग्ण सामान्य आयुष्य जगू शकतो, असेही पांडे यांनी सांगितले.