नागपूर : पतीच्या निधनानंतर पत्नीला अंबाझरीच्या आयुध निर्माणीत अनुकंपा तत्वावर नोकरी मिळाली. नोकरीसोबत तिने मुलींचाही सांभाळ केला. परंतु, अचानक प्रकृती खालावल्याने पतीच्या स्मृतीदिनीच (९ जून) तिचा मेंदूमृत झाला. अखेर जगाचा निरोप घेताना अवयवदानातून तिघांना नवीन आयुष्य दिले.

ललिता टवले (५७) रा. मशिद रोड, तुलानी स्वेअर, डिफेन्स, नागपूर असे अवयवदान केलेल्या महिलेचे नाव आहे. तिचे पती आयुध निर्माणी केंद्रात कार्यरत होते. दहा वर्षांपूर्वी त्यांचे ९ जूनला निधन झाले. त्यानंतर ललिता यांना अनुकंपा तत्वावर नोकरी मिळाली. उत्कृष्ट कामासाठी ललिता यांना २०१८ मध्ये पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. त्यांनी तिन्ही मुलींचा सांभाळ करत त्यांचे लग्न लावून दिले. दरम्यान, ९ जूनला अचानक प्रकृती खालावली. तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले गेले. मेंदूमृत झाल्याचे पुढे आले. ही माहिती त्यांच्या मुलींना कळवण्यात आली.

हेही वाचा – अकोलेकर भूमिपुत्राची संघर्षगाथा अमेरिकेत झळकणार; ‘मोर्णाकाठचा पांडुरंग’ लघुचित्रपटाला आंतरराष्ट्रीय महोत्सवामध्ये नामांकन

विभागीय अवयव प्रत्यारोपण समितीकडून कुटुंबियांना अवयवदानाचे महत्त्व सांगण्यात आले. कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला असतानाही त्यांनी अवयवदानाला होकार दर्शवला. त्यानुसार १० जूनला महिलेचे यकृत न्यू ईरा रुग्णालयातील एका गरजूमध्ये, एक मूत्रपिंड व्होकार्ट रुग्णालय व दुसरे मूत्रपिंड केअर रुग्णालयातील गरजू रुग्णामध्ये प्रत्यारोपित केले गेले.