गोंदिया : देवरी तालुक्यातील पालांदूर-जमीं या गावात अनेक वर्षापासून अवैध व चिल्लर दारू विक्री करणाऱ्या रवि बोडगेवार ऊर्फ अन्ना याच्या घरात पोलिस व वनविभागाने संयुक्त कारवाई करत छापा टाकला. यात वन्यजीवांचे अवयव, देशीदारूची पेटी व २१,४९,४४० रूपये रोख रक्कम सापडली. आरोपीला अटक करत पोलिस व वनविभागातर्फे युद्धपातळीवर तपास सुरू केला. तपासात आणखी चार आरोपी वनविभागाच्या हाती लागले. त्यात श्यामलाल ढिवरू मडावी, दिवास कोल्हारे, माणिक दारसु ताराम, अशोक गोटे हे चार ही रा. मंगेझरी ता. देवरी यांना रविवारीच अटक करण्यात आली. या पाचही आरोपींना २७ फेब्रुवारी रोजी न्यायालयाने २ मार्च पर्यंत वनकोठडी सुनावली आहे.
हेही वाचा >>> अहीरांच्या पराभवाला मुनगंटीवार तर माझ्या पराभवाला…, माजी खासदार चंद्रकात खैरेंचा थेट आरोप
एका दारू विक्रेत्यांकडे लाखो रूपयांची रोकड व वन्यजीवांचे अवयव हे वन्यजीवांच्या अवयवांच्या तस्करीचे की काय हा प्रश्न संबंधित प्रशासनासह नागरिकांनाही पडू लागला आहे. या प्रकरणाचा तपास आता वनविभाग करीत आहे. या संदर्भात गोंदिया जिल्हा पोलिसांनी माध्यमांशी संवाद साधतांना सांगीतले की एका दारू विक्रेत्यांकडून इतकी मोठी रक्कम हस्तगत होणे हे आश्चर्यच, त्यामुळे हे पैसे हस्तगत करण्यात आले ते दारूविक्रीतून की वन्यजीवांच्या अवयव तस्करीतून की अजून कुठल्या अवैध धंद्यातून आले की आणखी काही याबद्दल तपास सुरू आहे.
हेही वाचा >>> सावधान! ‘लिंक’वर ‘क्लिक’ करताच ३ लाख लंपास, केवायसीसह पॅनकार्ड जोडणीच्या नावावर सायबर गुन्हेगार सक्रिय
या प्रकरणात आतापर्यंत अटक झालेले ५ लोकच निश्चित नसणार, अजून लोकं असणार, आणखी काही ग्रामस्थ यात सहभागी असू शकतात. ज्यांना याबद्दल माहिती होती किंवा त्यांनी एखादी चुकीची कृत्य करताना मदत केली असेल. त्याचा तपास देखील सुरू आहे. तपासाअंती आपल्याला सांगता येईल की ही रक्कम कुठून आली. अटकेतील आरोपीत एक माजी नक्षलवादी असल्याचे निश्चित झाले आहे. तसेच या प्रकरणामध्ये बाहेरून कुठल्या प्रकारचा सहभाग किंवा संपर्क किंवा लिंक संबंधित आहे का, याबाबत पोलिस विभागाकडून विशेष तपास सुरू असल्याचे गोंदिया जिल्हा पोलिस अधीक्षक निखील पिंगळे यांनी माध्यमांशी बोलतांना सांगीतले.