बदलत्या परिस्थितीत शेतकऱ्यांना उत्पादन वाढीसाठी प्रोत्साहन देणे, विचारांची देवाणघेवाण करणे, आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा शाश्वत पद्धतीने अवलंब करून शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी जिल्हास्तरीय कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. हा जिल्हास्तरीय कृषी महोत्सव जिल्ह्याच्या ठिकाणी घेण्याबाबत १६ ऑक्टोंबर २०२० चा शासन निर्णय आहे. मात्र, कृषी विभाग आणि प्रकल्प संचालक (आत्मा) यांनी हा कृषी महोत्सव मुख्यालयापासून दूर असलेल्या मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन येथे ६ फेब्रुवारी ते १० फेब्रुवारी दरम्यान आयोजित केला आहे.
शेतकऱ्यांना शासनाच्या विविध कृषी योजना, उपक्रमाची माहिती व्हावी, संशोधित कृषी तंत्रज्ञान, नाविन्यपूर्ण प्रयोगशील शेतकऱ्यांचे अनुभव, बाजारपेठ व्यवस्थापन, कृषी पूरक व्यवसाय इत्यादी बाबतचे मार्गदर्शन व्हावे, कृषी प्रदर्शन, कृषी विषयक परिसंवाद, अनुभवी शेतकरी उद्योजकांची व्याख्याने, यशस्वी शेतकरी, शास्त्रज्ञ, तंत्रज्ञान व विचारवंत यांची भेट घडावी व सर्वसामान्य शेतकऱ्यांना शंका निरसन करून घेता यावे, उत्पादक ते ग्राहक थेट विक्री अश्या विविध संकल्पनेवर आधारित धान्य व खाद्य महोत्सव तसेच फळे, फुले व भाजीपाला महोत्सव इत्यादीचे आयोजन करण्यासाठी जिल्ह्यामध्ये दरवर्षी पाच दिवसाचा जिल्हा कृषी महोत्सव साजरा करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. यावर्षी जिल्हास्तरीय कृषी महोत्सव जिल्हा मुख्यालय पासून दूर असलेल्या मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन येथील जानगीर महाराज संस्थान परिसरात ६ फेब्रुवारी ते १० फेब्रुवारीदरम्यान आयोजित करण्यात आला. पाच दिवस चालणाऱ्या या महोत्सवाचा १० फेब्रुवारी रोजी समारोप करण्यात येणार आहे. शासनाने काढलेल्या शासन निर्णयानुसार हा महोत्सव जिल्हा स्तरावर घेण्याचे प्रयोजन असताना कृषी विभाग आणि प्रकल्प संचालक आत्मा यांनी हा महोत्सव जिल्ह्याचे मुख्यालयी न घेता मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन येथे घेतला आहे. या महोत्सवात जिल्ह्यातील ग्रामीण व दूरवरील शेतकरी कसे सहभागी होतील ? हा महोत्सव जिल्हा स्तरावर न घेता एका गावात का घेतला, असे अनेक प्रश्न उपस्थित होत असून शेतकऱ्यांमध्ये नाराजी सुरू उमटला आहे.
हेही वाचा >>>नागपूर: रेल्वेच्या जागेवरील २७ दुकाने जमीनदोस्त
जिल्हास्तरीय कृषी महोत्सव जिल्ह्याच्या ठिकाणी घेण्याचा शासन निर्णय आहे. परंतु जास्तीत जास्त लोकांचा सहभाग वाढवा, यासाठी जिल्हास्तरीय समितीने निर्णय घेऊनच हा महोत्सव शिरपूर येथे आयोजित केला आहे. त्या ठिकाणी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे त्या निमित्ताने अनेक लोक कृषी प्रदर्शनीला भेट देत आहेत. या उपक्रमास शेतकऱ्यांचादेखील प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.- शंकर तोटावर,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी