बेघर किंवा अनाथ असणे ही केवळ मानवाची समस्या नसून मुक्या प्राण्यांनाही या समस्यांना कायम सामोरे जावे लागते. मुक्या प्राण्यांच्या वेदना सहजासहजी कोणाच्या लक्षात येत नाही. मात्र यवतमाळातील काही महाविद्यालयीन तरुणांना करोना काळात या मुक्या प्राण्यांच्या वेदना जाणवल्या आणि पुढे त्यांच्या धडपडीतून यवतमाळात मुक्या जनावरांना मायेचा ‘ओलावा’ मिळण्याचे हक्काचे आश्रयस्थान निर्माण झाले. यातूनच उभ्या झालेल्या ‘ओलावा पशु प्रेमी संस्थे’ने आज रविवारी यवतमाळात पहिल्यांदाच आयोजित केलेल्या श्वानांच्या दत्तक शिबिरास शहरवासियांचा उदंड प्रतिसाद मिळाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- सिंचन विभागाच्या परवानगीविनाच बंधाऱ्याचे काम; चंद्रपूर शहरातील वस्त्यांना पुराचा धोका

रस्त्यावरील मुक्या प्राण्यांनाही मायेची गरज आहे, या जाणीवेतून सुमेध कापसे याने दीड वर्षांपूर्वी आपल्या मित्रांना सोबत घेऊन ‘ओलावा पशु प्रेमी संस्था’ स्थापन केली. शहरातील मोकाट जनावरांकरीता ही संस्था काम करत आहे. अपघात किंवा इतर कारणांनी मुक्या जनावरांवर आघात होतात. विविध आजारांनी ते ग्रस्त असतात. पण त्यांना बोलता येत नसल्याने त्यांच्या वेदना माणसांना कळत नाही. संवदेनशील माणसांना या वेदना कळल्या तरी अरेरे! म्हणण्यापलिकडे या संवदेना जात नाहीत. त्यामुळे या मुक्या जनावरांनाही हक्काचे आश्रयस्थान मिळावे यासाठी ओलावा संस्थेने प्रयत्न सुरू केले. शहरातील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले डॉ. अनिल पटेल, डॉ. विजय कावलकर, सुरेश राठी, डॉ. अलोक गुप्ता, दीपक बागडी, प्रा. घनश्याम दरणे आदींनी या तरुणांच्या कामाची दखल घेत त्यांना प्रोत्साहित केले. यातूनच शहरातील मोकाट श्वानांच्या पिलांना दत्तक देण्याची योजना पुढे आली.
आज रविवारी सकाळी येथील लोकनायक बापूजी अणे महिला महाविद्यालयाच्या सभागृहात हा दत्तक विधान कार्यक्रम झाला. यावेळी श्वानांच्या पिलांना दत्तक घेण्यासाठी यवतमाळकरांनी मोठी गर्दी केली होती. लॅब्रा, जर्मन शेफर्ड अशा परदेशी जातींची ‘क्रॉस’ पिलेही या शिबिरात मोठ्या प्रमाणात उपलब्ध होती. याशिवाय गावरानी श्वानांच्या पिलांना नागरिकांना पहिली पसंती दर्शविली. एक ते अडीच महिन्यांचे तब्बल ३० श्वान यावेळी नागरिकांनी दत्तक घेतले. या सर्वांना संस्थेच्या वतीने प्रमाणपत्र देण्यात आले. या श्वांनाची पुढील वर्षभर वैद्यकीय तपासणी, लसीकरण करण्याची जबादारी ओलावा संस्थेने स्वीकारली, असे सुमेध कापसे याने सांगितले.

हेही वाचा- अमेरिका, कोरिया, मॅक्सिकोच्या तुलनेत भारतात वैद्यकीय उपचार स्वस्त

‘ओलावा’मुळे मुक्या जनावरांना जीवनदान

पाळीव जनावरांवर नियमित वैद्यकीय उपचार, देखभाल होते. परंतु, मोकाट जनावरांकडे कोणाचेही लक्ष जात नाही. त्यासाठी ओलावा पशु, प्रेमी संस्था काम करते. करोना काळात टाळेबंदीदरम्यान ओलावाच्या सदस्यांनी मोकाट गायी, श्वान आदी प्राण्यांसाठी खाण्याची व्यवस्था केली. शहरातील मोकाट श्वानांचे लसीकरण केले, मृत्यूमुखी पडलेल्या बेवारस जनावरांचा दफनविधी केला. आपत्तीत सापडलेल्या पक्षांना जीवदान दिले. ओलावा संस्थेच्या सदस्यांना आता ‘रेस्क्यू’करीता सातत्याने नागरिकांचे फोन येतात. मात्र संस्थेला या कामासाठी निधीची कमतरता भासत आहे. त्यामुळे या पशू, पक्षांच्या उत्थानासाठी काम करताना या कार्यात लोकसहभाग मिळाला तर आर्थिक अडचणींवर मात करता, येईल, असा विश्वास सुमेध व त्याच्या मित्रांनी व्यक्त केला आहे. या कामात डॉ. माया गायकवाड, डॉ. पूजा कळंबे, मयंक अहिर, आशय नंदनवार, प्रांजली चौधरी, श्रेया वनकर, चेतन बोरकर, पवन बोरकर, बादल कंडारे, नीलेश पेंडले, भूषण घोडके, मनोज चमेडिया, यश श्रीवास, सचिन काकडे, सागर दुबे, नयन बोंद्रे, अतूल बोंद्रे, कपिल टेकाम, कार्तिक चौधरी आदी पुढाकर घेऊन मुक्या जनावरांना मायेचा ओलावा देत आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Organization of dog adoption camp by olava pashu premi sanstha in yavatmal dpj
Show comments