देशाच्या हृदयस्थानी असलेल्या नागपूरचा नव्या वर्षाचा पहिला आठवडा म्हणजे वैज्ञानिकांची मांदियाळी राहणार आहे. मंगळवारपासून सुरू होणाऱ्या १०८व्या भारतीय विज्ञान काँग्रेससाठी भारतीच्या विविध राज्यातील शास्त्रज्ञ, प्राध्यापक, संशोधक, शालेय विद्यार्थ्यांचे आगमन सुरू झाले आहे. यजमानपद भूषवणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने विज्ञान काँग्रेसच्या दिशेने संपूर्ण तयारी झाली असून विद्यापीठ परिसराला जणू विज्ञानाच्या पंढरीचे रूप आले आहे.
हेही वाचा– आरोप-प्रत्यारोपांमध्ये विदर्भाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष
भारतीय विज्ञान काँग्रेससाठी नागपूर विद्यापीठाच्या अमरावती मार्गावरील शैक्षणिक परिसर सज्ज आहे. ३ ते ७ जानेवारीपर्यंत चालणाऱ्या विज्ञान काँग्रेससाठी मोठे शामियाने तयार करण्यात आले आहेत. मंगळवारी सकाळी ९.३० वाजता उद्घाटन सोहळा असल्याने देश-विदेशातील मान्यवरांसह विद्यार्थ्यांचे सोमवारपासूनच आगमन सुरू झाले आहे. परिषदेसाठी नोंदणी केलेल्यांना रितसर प्रवेशिकांचे वाटप करून सार्वजनिक वाहनाने निवासाच्या ठिकाणी सोडून दिले जात आहे. या विज्ञान काँग्रेसचे मुख्य आकर्षण हे ‘प्राईड ऑफ इंडिया’ म्हणजेच ‘शान भारताची’ हे महाप्रदर्शन राहणार आहे. यासाठी भव्य असा शामियाना उभारण्यात आला असून तेथे सरकारच्या विविध विभागांमध्ये सुरू असलेल्या नवनवीन संशोधनांचे प्रदर्शन राहणार आहे. हे प्रदर्शन भारताची वैज्ञानिक प्रगतीचा परिपाठ राहणार आहे. भारतीय विज्ञान परिषदेची परंपरा असलेला विज्ञान ज्योत कार्यक्रम पार पडला. ‘झिरो माइलस्टोन’ येथे चारशेहून अधिक शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी जमले आणि या विद्यार्थ्यांनी खास टोप्या तसेच टी-शर्ट परिधान करून विद्यापीठ परिसराकडे रॅली काढली. या विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात वैज्ञानिक विचार अंगीकारण्याची प्रतिज्ञा घेतली. विज्ञानाचा अभ्यास केवळ शिक्षणातील एक विषय म्हणून न ठेवता आपण जीवनात जे काही करतो त्याचा एक भाग बनवा, असे आवाहन भारतीय विज्ञान परिषद संघटनेच्या सरचिटणीस डॉ. विजय लक्ष्मी सक्सेना यांनी केले.
हेही वाचा- ‘मार्ड’च्या संपाने यवतमाळात रुग्णसेवा कोलमडली
सायन्स काँग्रेसची व्यापकता
- विज्ञान काँग्रेसमध्ये १० ते १२ हजार प्रतिनिधी सहभागी होतील. त्यात १०० पेक्षा जास्त वक्ते व तज्ज्ञ राहतील.
- विज्ञान काँग्रेसमध्ये ३ हजारापेक्षा जास्त पेपर प्रेझेंटेशन केले जातील. सुमारे १०० संशोधक मार्गदर्शन करतील.
- ५०० पेक्षा जास्त आदिवासी प्रतिनिधी व एक हजारावर शेतकरीही विज्ञान काँग्रेसमध्ये उपस्थित होतील.