वर्धा : संमेलनास येताय, या. पण वेळेवर न पोहचल्याने व्यवस्था न झाल्यास हताश होऊ नका. वर्धेकर तुम्हास आपल्या घरी स्वतःच्या वाहनाने नेतील व तीन दिवस सरबराई करतील. आयोजकांनी ‘आमचेही पाहुणे’ हा उपक्रम पुरस्कृत केला आहे. अपेक्षित पेक्षा अधिक पाहुणे आल्यास निवास व्यवस्था कोलमडू शकते. त्यामुळे धावपळ होऊ नये म्हणून नागरिकांची मदत या उपक्रमातून घेण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी अर्ज भरून घेणे आजपासून सुरू झाले.
इच्छूक नागरिकांना या अर्जात त्यांच्याकडे उपलब्ध खोल्या, स्वच्छता घर, स्वतःचे वाहन, सकाळचा नाश्ता, शाकाहारी की मांसाहारी, स्वतःचा व्यवसाय, कुटुंबातील संख्या व अनुषंगिक माहिती द्यायची आहे. प्रतिनिधींच्या इच्छेनुसार त्यांची सोय अशा वर्धेकरांकडे केली जाणार आहे. मोफत नव्हे तर माफक पैसे आकारून ही सुविधा मिळणार. कोणत्याही जात, धर्मभेदाशिवाय या उपक्रमात सहभागी होणार असल्याचे लिहून द्यायचे आहे.