नागपूर : येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) एका मेंदूमृत रुग्णाच्या अवयवदानातून पाच कुटुंबांना मोठा आधार मिळाला. जिवंत असताना अन्नदाता असलेला शेतकरी जग सोडताना प्राणदाता झाला. गणेश सवई (४४) रा. शिवणी, छिंदवाडा, मध्य प्रदेश असे मेंदूमृत शेतकऱ्याचे नाव आहे. १४ ऑगस्टला शेतीतील काम पूर्ण केल्यावर ते दुचाकीने घराकडे निघाले. तोल गेल्याने खाली पडून गंभीर जखमी झाले. नातेवाईकांनी त्यांना एम्स रुग्णालयात हलवले. एम्सच्या तज्ज्ञांकडून त्यांना वाचवण्यासाठी शर्थिचे प्रयत्न झाले. परंतु उपचाराला प्रतिसाद नसल्याने तपासणी केली गेली. त्यात त्यांचा मेंदूमृत झाल्याचे पुढे आले.
हेही वाचा : कोरड्या ऑगस्ट महिन्याची नोंद टळली, विदर्भासह कोकणात आजपासून कोसळधारा
एम्सचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनिष श्रीगिरीवार यांना या बाबत माहिती मिळाल्यावर त्यांनी विभागीय अवयव प्रत्यारोपण समितीला या रुग्णाबाबत सूचना दिली. एम्सच्या डॉक्टरांसह समितीकडून नातेवाईकांना अवयवदानाचे महत्व सांगण्यात आले. कुटुंबीयांनी होकार दर्शवताच रुग्णाशी गुणधर्म जुळणाऱ्या रुग्णाचा शोध सुरू झाला. त्यानुसार एक मूत्रपिंड एम्सच्या प्रतीक्षा यादीतील ५० वर्षीय पुरुषाला, दुसरे एसएस रुग्णालयातील ५४ वर्षीय महिला रुग्णाला तर यकृत न्यू ईरा रुग्णालयातील ५७ वर्षीय पुरुष रुग्णात प्रत्यारोपित झाले. बुब्बुळ महात्मे आय बँकेला देण्यात आले आहे. ते दोन रुग्णात प्रत्यारोपित केले जाणार आहेत. त्यामुळे एकूण पाच कुटुंबांना आधार मिळणार आहे.