नागपूर : नागपुरात ‘एच ३ एन २’ आजार असलेल्या ७८ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला होता. महापालिकेच्या मृत्यू अंकेक्षण समितीच्या बुधवारच्या बैठकीत संबंधित रुग्णाला सीओपीडी, मुत्रपिंड, हृदयरोग, मधूमेह, निमोनियासह इतरही बरेच सहआजार असल्यामुळे त्याच्या गुंतागुंतीमुळेच हा मृत्यू झाल्याचे पुढे आले. त्यामुळे हा मृत्यू समितीने ‘एच ३ एन २’ ऐवजी इतर आजाराने दाखवला आहे.

हेही वाचा – शासकीय कर्मचारी संप : आरोग्यव्यवस्था कोलमडू नये म्हणून सेवाग्राम व सावंगी रुग्णालय प्रशासनाच्या दिमतीला; संपकऱ्यांना आता…

हेही वाचा – नागपूर : लैंगिक हेतूशिवाय स्पर्श करणे गैरवर्तन नाही ; उच्च न्यायालयाचे निरीक्षण

नागपूर महापालिकेत झालेल्या मृत्यू अंकेक्षणाच्या बुधवारच्या बैठकीला महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, महापालिकेचे साथरोग अधिकारी डॉ. गोवर्धन नवखरे, क्रिम्स रुग्णालयाच्या डॉ. शबनम खान आणि इतरही अधिकारी उपस्थित होते. बैठकीत क्रिम्स रुग्णालयाकडून रुग्णाची सविस्तर माहिती दिली गेली. त्यात रुग्णाला ‘क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज’ (सीओपीडी), गंभीर संवर्गातील निमोनिया, मुत्रपिंड आणि हृदयरोग, उच्च रक्तदाब, मधूमेहसह इतरही सहआजार असल्याचे स्पष्ट केले गेले. उपचारादरम्यान केलेल्या तपासणीत त्याला ‘एच ३ एन २’ आजारही असल्याचे पुढे आले. समितीने सविस्तर चर्चा केल्यावर या मृत्यूला इतर सहआजार जबाबदार असल्याचे स्पष्ट करत हा मृत्यू ‘एच ३ एन २’ आजाराऐवजी इतर आजारात दर्शवण्यात आला. या वृत्ताला महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार यांनी दुजोरा दिला आहे.

Story img Loader