वर्धा : विद्यार्थी दशेत सर्वात अधिक खेळला जाणारा खेळ म्हणून क्रिकेटची ओळख आहे. शाळेत किंवा उन्हाळी सुट्टीत याच खेळावर विद्यार्थांच्या उड्या पडतात. मात्र शाळेतील खेळाडूंसाठी दिल्या जाणाऱ्या सवलतीच्या गुणास ते पात्र ठरत नसल्याची बाब पुढे आली आहे.
सवलितीचे असे वाढीव गुण खेळ संघटनेच्या शिफारशीनुसार दिल्या जातात. खो खो, कबड्डी, जलतरण, व्होली बॉल व अन्य एकूण ४६ खेळांना हे गुण मान्य झाले आहेत. तर क्रिकेट, सिकई, डोज बॉल व थ्रो बॉल हे चार खेळ खेळणाऱ्या शालेय खेळाडूंना गुण मिळण्यास अपात्र ठरविण्यात आले आहे. कारण काय तर त्यांची संलग्नता नाही. शासन निर्णयानुसार क्रिकेट खेळ प्रकारच्या राष्ट्रीय संघटनेस केंद्र शासनाच्या क्रीडा विभागाची सलग्नता नाही. तसेच इंडियन ऑलिम्पिक असोसिएशन किंवा क्रिकेटच्या राज्य संघटनेस महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनची संलग्नता नाही. तसे नसल्याने क्रीडा गुण मिळण्यास शालेय क्रिकेटपटू अपात्र ठरतात, असे क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने स्पष्ट केले आहे.
इतर खेळातील शालेय खेळाडूंना विविध स्पर्धेत सहभागी असल्याचे प्रमाणपत्र जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडून प्राप्त करून घ्यायचे आहेत. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्य पातळीवरील स्पर्धेत सहभागी दहावी व बारावीत शिकणाऱ्या खेळाडूंना दहा ते वीस दरम्यान क्रीडा गुण दिल्या जात असतात.