लोकसत्ता टीम

नागपूर : शहरात गुन्हेगारांनी तोंड वर काढले असून गुन्हेगारी वाढत आहेत. गुन्हेगारांवर अंकुश ठेवण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात अधिकारी नियुक्त असायला हवे. परंतु, शहरातील ३४ पैकी तब्बल २१ पोलीस ठाण्यात गुन्हे निरीक्षकांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे गुन्हेगारीवर नियंत्रण कसे मिळवणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

नागपूर शहर पोलीस आयुक्तालयात ३४ पोलीस ठाणे आहेत. तसेच नुकताच पोलीस आयुक्तालयात जवळपास ३० नवे पोलीस निरीक्षक रूजू झाले आहे. आयुक्तालयात पुरेसे पोलीस निरीक्षक दर्जाचे अधिकारी नसल्याची ओरड आहे. शहरातील ३४ पोलीस ठाण्यापैकी तब्बल २१ पोलीस ठाण्यात गुन्हे पोलीस निरीक्षकांची नियुक्तीच नसल्याने गुन्हेगारावर वचक राहिला नाही. शहरातील अनेक पोलीस ठाण्यात नुकताच एक-दोन वर्षांपूर्वी सहायक पोलीस निरीक्षक ते पोलीस निरीक्षक अशी पदोन्नती मिळालेले ठाणेदार देण्यात आले.

आणखी वाचा-वर्धा : ‘समृद्धी’च्या नावाने शेतकरी मोडताहेत बोटं! शेतशिवारांचे झाले तलाव…

त्यामुळे त्यांच्या हाताखाली गुन्हे निरीक्षक म्हणून काम करण्यासाठी कनिष्ठ पोलीस निरीक्षकांची संख्या अपुरी आहे. तसेच बाहेर जिल्ह्यातून आलेल्या काही पोलीस निरीक्षकांना नागपूर शहराचा अनुभव नसुनही त्यांना ठाणेदारी देण्यात आली. नवख्यांना ठाणेदारी तर अनुभवी पोलीस अधिकाऱ्यांना आर्थिक गुन्हे शाखा, विशेष शाखा आणि गुन्हे शाखेच्या पथकात देण्यात आले. नवखे ठाणेदार आणि त्यातही गुन्हे निरीक्षक पद रिक्त असल्यामुळे पोलीस ठाण्याचा कारभार ढेपाळल्याचे चित्र शहरात आहे.

परीमंडळ चार आणि पाचकडे दुर्लक्ष?

शहरातील पोलीस उपायुक्त परीमंडळ चार आणि पाचमध्ये पोलीस ठाण्यात गुन्हे निरीक्षक अधिकारी नाही. त्यामुळे दोन्ही झोनकडे पोलीस आयुक्तांचे दुर्लक्ष असल्याचे दिसते. परीमंडळ पाचमधील कळमना वगळता एकाही पोलीस ठाण्याला गुन्हे निरीक्षक नाहीत. दोन्ही परीमंडळ गुन्हेगार आणि अवैध धंद्यांसाठी ओळखल्या जातात. तरीही गुन्हे निरीक्षक नसल्याने आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.

आणखी वाचा-नागपूर : कानाला मोबाईल अन् हातात कारचे स्टेअरिंग, महिलेने तिघांना उडवले

एपीआय अधिकाऱ्यांवर जबाबदारी

शहरातील १३ पोलीस ठाण्यात गुन्हे निरीक्षक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, त्यापैकी काही पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक दर्जाचा अधिकारी नसल्यामुळे सहायक पोलीस निरीक्षकावर गुन्हे निरीक्षक पदाची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे काही पोलीस ठाण्याचा थातूरमातूर कारभार सुरु असल्याची चर्चा आहे.